

जम्मू : नियंत्रण रेषेवरील (एलओसी) उरी सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलिस आणि अन्य सुरक्षा संस्थांनी संयुक्त सर्च अँड डिस्ट्रॉय मोहीम राबविली. सुरक्षा दलांनी घातलेला वेढा पाहून घुसखोरांनी एलओसी ओलांडून पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीत पलायन केले. मात्र, घाईगडबडीत त्यांनी शस्त्रे आणि दारुगोळ्याने भरलेली बॅकपॅक घटनास्थळीच सोडून दिली.
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरच्या हतलंगा परिसरातून सीमा ओलांडून घुसखोरी होण्याची शक्यता असल्याची विशिष्ट माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर संबंधित भागात तातडीने संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली. कारवाईदरम्यान नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली आढळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालून कसून शोधमोहीम सुरू केली. शस्त्रसाठा जप्त झाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू ठेवली आहे.
घटनास्थळी मिळालेल्या बॅकपॅकची तपासणी केली असता त्यामधून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. यात दोन एके रायफल, दोन एके मॅगझिन, २५६ जिवंत काडतुसे, एक पिस्तूल, दोन पिस्तूल मॅगझिन, पाच जिवंत हँड ग्रेनेड, एक बॅग तसेच पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आलेल्या सिगारेटची पाच पाकिटे आढळून आली.