

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताची विमान कंपनी इंडिगोने शुक्रवारी अंदाज व्यक्त केला की, गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात विमानसेवा रद्द झाल्यामुळे फटका बसलेल्या ग्राहकांना एकूण 5 अब्ज रुपयांपेक्षा जास्त (55.19 दशलक्ष डॉलर्स), म्हणजेच 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाई द्यावी लागेल. पायलटच्या रोस्टर नियोजनातील त्रुटींमुळे या विमान कंपनीने गेल्या आठवड्यात सुमारे 4,500 उड्डाणे रद्द केली होती, ज्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले होते. यानंतर, नागरी विमान वाहतूक नियामकाने कंपनीला आपल्या देशांतर्गत हिवाळी वेळापत्रकात 10 टक्के कपात करण्याचे निर्देश दिले.
कमी दरातील विमान कंपनीने वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी ज्या प्रवाशांना मोठा फटका बसला आणि जे विमानतळांवर अडकून पडले होते, अशा विमानसेवा ओळखण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या प्रवाशांची उड्डाणे ‘प्रवासाच्या 24 तास आधी रद्द झाली’ आणि/किंवा ‘जे प्रवासी विशिष्ट विमानतळांवर मोठ्या प्रमाणात अडकून पडले होते,’ अशा ग्राहकांना इंडिगो भरपाई देईल, असेही कंपनीने म्हटले आहे.