

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशातील २१९ गर्भश्रीमंत व्यक्तींनी ११ हजार ५५४ कोटी रुपये खर्च केले आहेत. दानशूर व्यक्तींच्या यादीत शिव नाडर आणि कुटुंब आघाडीवर असून, त्यांनी २ हजार ५९३ कोटी रुपये समाजोपयोगी कामांवर खर्च केले आहेत. खालोखाल गौतम अदानी, बजाज कुटुंब आणि मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाचा समावेश आहे.
सामाजिक कार्यासाठी या गर्भश्रीमंत व्यक्तींनी गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के अधिक निधी खर्च केला आहे. ‘एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रोपी लिस्ट’मधील दानशूर व्यक्तींची संख्या १९२ वरून वाढून २१९ वर पोहोचली आहे. मात्र, ‘एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६’मधील भारतातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी केवळ चार व्यक्ती शिव नाडर आणि कुटुंब, गौतम अदानी आणि कुटुंब, मुकेश अंबानी आणि कुटुंब, तसेच पूनावाला कुटुंब (सायरस आणि आदर) हेच टॉप १० दानशूर व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवू शकले आहेत.
एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत या २१९ भारतीय व्यक्तींनी मिळून ११,५५४ कोटी रुपयांचे दान दिले. हे प्रमाण आर्थिक वर्ष २०२५ मधील १०,३८० कोटी रुपयांच्या तुलनेत ११ टक्क्यांनी अधिक आहे. या यादीत अशा भारतीय व्यक्तींचा समावेश आहे ज्यांनी किमान ५ कोटी रुपयांचे दान दिले आहे.
शिव नाडर आणि त्यांचे कुटुंब सलग पाचव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. त्यांनी २,५९३ कोटी रुपयांचे दान दिले आहे. यातील ९३ टक्के वाटा वैयक्तिक संपत्तीतून दिला आहे. कला, संस्कृती आणि वारसा जपणुकीसाठी सर्वाधिक १,२२० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाचे दान १२७ टक्क्यांनी वाढून ३८६ कोटी रुपयांवरून ८७७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बजाज कुटुंब ६३२ कोटी रुपयांच्या दानासह तिसऱ्या क्रमांकावर, तर मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब ६२० कोटी रुपयांच्या दानासह चौथ्या क्रमांकावर आहे.
वैयक्तिक दान निम्म्याहून कमी
एकूण १९२ दानशूर व्यक्तींपैकी केवळ ४२ व्यक्तींनी स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीतून दान दिले आहे. त्यांनी ५,४१३ कोटी रुपयांचे योगदान दिले, जे एकूण दान रकमेच्या ४७ टक्के आहे. उर्वरित ५३ टक्के रक्कम कंपन्यांच्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) उपक्रमांतून आली आहे.