

Unemployment Rate : ऑगस्ट २०२५ मध्ये भारताचा एकूण बेरोजगारीचा दर ५.१% पर्यंत घसरला आहे. जूनमध्ये हा दर ५.६ टक्के होता, जुलैमध्ये ५.२ टक्क्यांवर, तर आता ऑगस्टमध्ये ५.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाने (MoSPI) आज जारी केलेल्या नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey- PLFS) मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांमधील बेरोजगारीचा दर ५.० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, जो एप्रिल २०२५ नंतरचा सर्वात कमी दर आहे. शहरी पुरुषांमधील बेरोजगारीचा दर जुलैमध्ये ६.६ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ५.९ टक्क्यांवर आला, तर ग्रामीण पुरुषांमधील बेरोजगारी ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर सलग तीन महिन्यांपासून घटत आहे. तो मेमध्ये ५.१ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ४.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. एकूण ग्रामीण आणि शहरी बेरोजगारीचा दर ५.१ टक्के राहिला.
श्रमिक लोकसंख्या प्रमाण (Worker Population Ratio- WPR) ऑगस्टमध्ये महिलांसाठी ३०.२ टक्क्यांवरून ३२.० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ग्रामीण महिलांसाठी हे प्रमाण जूनमधील ३३.६ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ३५.९ टक्क्यांपर्यंत वाढले. तर शहरी महिलांसाठी हे प्रमाण जूनमध्ये २२.९ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये २३.८ टक्क्यांपर्यंत वाढले. त्याचप्रमाणे, महिलांसाठी श्रमशक्ती सहभाग दर (Labour Force Participation Rate- LFPR) जूनमधील ३२.० टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ३३.७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
ग्रामीण महिलांचा रोजगारातील सहभाग जूनमध्ये ३५.२ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ३७.४ टक्क्यांपर्यंत वाढला, तर शहरी महिलांसाठी एलएफपीआर जूनमध्ये २५.२ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये २६.१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एकूण श्रमिक लोकसंख्या प्रमाण (WPR) जूनमधील ५१.२ टक्क्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ५२.२ टक्क्यांपर्यंत वाढले. १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी एकूण LFPR जूनमधील ५४.२ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ५५ टक्क्यांपर्यंत वाढला. ऑगस्ट २०२५ ची ही आकडेवारी ३,७६,८३९ व्यक्तींच्या प्रतिसादांवर आधारित आहे, ज्यात ग्रामीण भागातील २,१५,८९५ आणि शहरी भागातील १,६०,९४४ व्यक्तींचा समावेश आहे.