

India's population will stabilize at 1.9 crore by 2080
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची लोकसंख्या सन २०८० पर्यंत सुमारे १८० ते १९० कोटींवर स्थिर होण्याची शक्यता आहे, असा अंदाज इंडियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ पॉप्युलेशन (आयएएसपी) या लोकसंख्येचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने व्यक्त केला आहे.
संस्थेच्या अहवालात म्हटल्यानुसार, सुधारित शिक्षण, महिला साक्षरता, गर्भनिरोधकांचा वाढता वापर, लहान कुटुंबे आणि उशिरा होणारे विवाह यांमुळे भारताचा एकूण प्रजनन दर (टीएफआर) २००० मधील टीएफआर ३.५ वरून १.९ टीएफआरपर्यंत घसरला आहे. भारत वेगवान लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या टप्प्यातून जात आहे आणि गेल्या २० वर्षांत जन्म दर झपाट्याने घसरला आहे. भारताची कमाल लोकसंख्या दोन अब्जपेक्षा कमी राहील आणि २०८० पर्यंत वाढ स्थिर झाल्यावर ती सुमारे १.८ ते १.९ अब्जांवर पोहोचून सर्वोच्च पातळी गाठेल अशी अपेक्षा आहे.
केरळमध्ये १९८७ ते १९८९ दरम्यान रिप्लेसमेंट लेव्हल फर्टिलिटी (२.१) गाठली गेली होती आणि आता तेथे टीएफआर सुमारे १.५ आहे. तसेच पश्चिम बंगालमध्येही प्रजनन दरात मोठी घट दिसून येत आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम स्टॅटिस्टिकल रिपोर्ट २०२३ नुसार, पश्चिम बंगालचा टीएफआर २०१३ मधील १.७वरून १.३ पर्यंत घसरला आहे.
प्रजनन दरात घट कशामुळे?
जन्म दर कमी होत असूनही सुधारित आरोग्यसेवेमुळे आयुर्मान वाढत आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. प्रजनन दरातील घट मुख्यतः वाढलेला विकास आणि शिक्षणाची पातळी यामुळे झाली आहे. वाढलेल्या महिला साक्षरतेने लग्न आणि मुलांच्या जन्माविषयीच्या निर्णयांवर थेट परिणाम केला आहे. यामुळे कुटुंबे लहान झाली आहेत. गर्भनिरोधकांचा वाढता वापर आणि जन्म नियंत्रणाच्या साधनांची व्यापक उपलब्धता यामुळे ही घट आणखी वेगाने झाली आहे.
काय आहे आयएएसपी
१९७१ मध्ये स्थापन झालेल्या आयएएसपीमध्ये सुमारे १,१०० लोकसंख्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे. ही संस्था यूएनएफपीए, पॉप्युलेशन कौन्सिल आणि पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने नियमितपणे विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करते.