

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चायवाला’ ते ‘प्रधानमंत्री’ या प्रवासाची नेहमीच चर्चा होत असते. आता लंडनमध्ये एका भारतीय वंशाच्या चहा विक्रेत्याने पंतप्रधान मोदींना चहा देताना केलेल्या मार्मिक टिप्पणीने सर्वांची मनं जिंकली.
भारत आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष कीर स्टारमर यांनी चेकर्स येथील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी चहाचा आस्वाद घेतला. यावेळी ‘अमला चाय’चे संस्थापक, भारतीय वंशाचे उद्योजक अखिल पटेल यांनी खास चहाचा स्टॉल लावला होता. पटेल यांनी हा चहा भारतातून आणलेला, पण लंडनमध्ये बनवलेला आहे, असे सांगत दोन्ही नेत्यांचे स्वागत केले.
अखिल पटेल यांनी दोन्ही नेत्यांसाठी चहा बनवताना सांगितले, या चहासाठी आसामची चहापत्ती आणि केरळचे मसाले वापरले आहेत. मात्र, जेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींना चहाचा कप दिला, तेव्हा त्यांचे ‘एका चहावाल्याकडून दुसर्या चहावाल्याला’ हे वाक्य चर्चेचा विषय ठरले. पंतप्रधान मोदींनीही स्मितहास्य करत दाद दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहा पाजणाऱ्या या व्यक्तीचे नाव अखिल पटेल आहे. अखिलला लंडनचा चायवाला म्हणून ओळखले जाते. अखिल यूकेमधील एक उद्योगपती आणि अमाला चहाचे संस्थापक आहेत. ताो मूळचे भारतीय असलेले ब्रिटन नागरीक आहेत. अमाला चहा लंडनमधील एक ब्रँड आहे जो भारतीय मसाला चहासाठी प्रसिद्ध आहे. अखिल पटेल यांच्या कुटुंबाचे भारताशी खोल नाते आहे. त्यांची आजी ५० वर्षापूर्वी एका चांगल्या संधीच्या शोधात ब्रिटनमध्ये गेली होती. अखिल पटेल यांचे शिक्षण लंडनमध्येच झाले.