Indian Army | गोठवणार्‍या थंडीत जवान सीमेवर

एलओसी, एलएसी, कारगिल येथे हवामान कठोर; प्रचंड हिमवृष्टी
Indian Army | गोठवणार्‍या थंडीत जवान सीमेवर
Pudhari File Photo
Published on
Updated on

अनिल साक्षी

जम्मू : देशाच्या सीमांचे रक्षण करताना भारतीय जवान ज्या परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत आहेत, त्याला खरोखरच सलाम करावा लागेल. लडाखमधील चीन सीमेलगतची एलएसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल), कारगिल, सियाचीन आणि काश्मीरमधील एलओसी (लाईन ऑफ कंट्रोल) या भागांमध्ये सध्या हवामान अत्यंत कठोर झाले आहे. शून्याखाली अनेक अंश तापमान, प्रचंड हिमवृष्टी आणि ताशी 100 ते 150 किलोमीटर वेगाने वाहणारे बर्फाळ वारे, अशा स्थितीतही भारतीय जवान छाती ताठ ठेवून देशरक्षणाचे कर्तव्य निभावत आहेत.

या भागांमध्ये एकीकडे पाकिस्तानकडून असलेला सततचा धोका आहे, तर दुसरीकडे चीनच्या सैन्याचीही आव्हानात्मक उपस्थिती आहे. त्यातच निसर्गानेही कठोर रूप धारण केले आहे. जोरदार बर्फाळ वार्‍यांमुळे क्षणभर उभे राहणेही कठीण होते. चारही बाजूंनी उंचच उंच बर्फाच्या भिंती, गोठवून टाकणारी थंडी आणि कमी द़ृश्यमानता- अशा परिस्थितीतही भारतीय जवान अत्यंत धैर्याने सीमेवर तैनात आहेत. एलओसीसह कारगिल आणि सियाचीन हिमखंडातही भारतीय सैनिक दररोज शौर्याची नवी गाथा लिहीत आहेत. येथे वीरता केवळ शत्रूशी लढूनच सिद्ध होत नाही, तर निसर्गावर मात करूनही सिद्ध करावी लागते आणि ती जबाबदारी जवान अत्यंत निष्ठेने पार पाडत आहेत.

लडाख, कारगिल आणि गलवान भागात तापमान शून्याखाली घसरले आहे. भारतीय सेना विशेष हिवाळी गणवेश, उच्च-उंचीवरील उपकरणे, अचूक हवामान निरीक्षण प्रणाली आणि विशेष प्रशिक्षणाचा वापर करत आहे. कमी ऑक्सिजन आणि तीव्र थंडीत काम करणे ही केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक कसोटीही आहे.

सियाचीनमध्ये तापमान उणे 30 अंश

जगातील सर्वात उंच आणि कठीण लष्करी क्षेत्रांपैकी एक असलेल्या सियाचिन ग्लेशियरमध्ये हिवाळ्यात तापमान उणे 30 अंश सेल्सियस किंवा त्याही खाली जाते. वर्षभर बर्फ आणि हिमनद्या यांच्यात भारतीय सेनेच्या अग्रिम चौक्या कार्यरत असतात. भीषण थंडी, बर्फाची वादळ आणि जीवघेणे हवामान असूनही जवान चोवीस तास निगराणी, ऑपरेशनल ड्युटी बजावत असतात.

लडाख-कारगिलमध्ये दिवसा 7 अंश, रात्री उणे

लडाख आणि कारगिल सेक्टरमध्ये दिवसाचे तापमान उणे 7 ते उणे 10 अंश सेल्सियस असून, रात्री ते उणे 15 अंशांखाली घसरते. अलीकडील हिमवृष्टीमुळे उंच दर्रे आणि अग्रिम पोस्टांवर जाड बर्फाचा थर साचला आहे. घसरडी जमीन आणि मर्यादित हालचाली असूनही रसद पुरवठा, संपर्क व्यवस्था आणि सततची निगराणी राखणे हे भारतीय सेनेचे नियमित कार्य आहे.

गलवान खोर्‍यात तापमान 5 ते 8 अंशांवर

गलवान खोर्‍यात दिवसा तापमान 5 ते 8 अंश सेल्सियस असते, मात्र रात्री ते शून्याखाली जाते. उंच कड्यांवर आणि पोस्टांवर कायमस्वरूपी बर्फ साचलेला असतो. अशा परिस्थितीत सातत्याने पेट्रोलिंगसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण, शारीरिक क्षमता आणि मानसिक दृढता आवश्यक असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news