Indian Pilots | भारतीय वैमानिक देणार ब्रिटनच्या एअर फोर्सला धडे

Indian Pilots |
Indian Pilots | भारतीय वैमानिक देणार ब्रिटनच्या एअर फोर्सला धडे
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : १९३२ मध्ये ब्रिटिशांनी भारतात हवाई दलाची स्थापना केल्यानंतर, तब्बल एका शतकानंतर इतिहासाची पुनरावृत्ती नव्या रूपात झाली आहे. भारतीय हवाई दलाचे तीन वैमानिक ब्रिटनच्या 'रॉयल एअर फोर्स'च्या तरुण वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक म्हणून दाखल झाले आहेत.

भारतीय हवाई दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'क्वालिफाईड फ्लाईंग इन्स्ट्रक्टर्स' ब्रिटनमध्ये पाठवण्यात आले आहेत. हे तीन वैमानिक वेल्समधील 'आरएएफ व्हॅली' येथे रुजू झाले असून सुरुवातीला त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. एका स्क्वॉड्रन लीडर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही चमू काम करत आहे. हे अधिकारी भारतीय हवाई दलाच्या कमांडखाली राहून ब्रिटनच्या आरएएफ कमांडर्सच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देतील. दोन्ही देशांनी स्वीकारलेल्या 'इंडिया-यूके व्हिजन २०३५' आणि १० वर्षांच्या संरक्षण औद्योगिक आराखड्यामुळे तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रे आणि लष्करी प्रशिक्षणातील सहकार्य वेगाने विस्तारत आहे.

हॉक टी-२ विमानांवर देणार प्रशिक्षण

भारतीय प्रशिक्षक आरएएफच्या वैमानिकांना 'बीएई हॉक टी-२' या प्रगत जेट विमानावर प्रशिक्षण देतील. विशेष म्हणजे, भारतीय हवाई दलही आपल्या लढाऊ वैमानिकांच्या अंतिम प्रशिक्षण टप्प्यासाठी याच विमानाचा वापर करते. आरएएफमध्ये लढाऊ विमानांचे उड्डाण करण्यापूर्वीच्या प्रगत प्रशिक्षणाचा हा अखेरचा टप्पा मानला जातो. संरक्षण सहकार्याला नवी दिशानवी दिल्लीत पार पडलेल्या १९ व्या 'यूके-इंडिया एअर स्टाफ' चर्चेनंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

तिन्ही दलांचे प्रशिक्षक ब्रिटनमध्ये कार्यरत

या नियुक्तीमुळे दोन्ही देशांमधील लष्करी देवाणघेवाण अधिक व्यापक झाली आहे:

रॉयल एअर फोर्स कॉलेज, क्रॅनवेल : जानेवारीपासून भारतीय हवाई दलाचा एक अधिकारी कार्यरत.

ब्रिटानिया रॉयल नेव्हल कॉलेज, डार्टमाऊथ : मे २०२४ पासून भारतीय नौदलाचे अधिकारी प्रशिक्षक म्हणून नियुक्त.

रॉयल मिलिटरी ॲकॅडमी, सँडहर्स्ट : मे २०२५ पासून भारतीय लष्कराचे अधिकारी कार्यरत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news