नवी दिल्ली : पुढील तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जर्मनी आणि जपानला मागे टाकेल, असे भाकित नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी गुरुवारी केले. २०४७ पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो, असे नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम म्हणाले. सुब्रमण्यम दिल्लीत एका कार्यक्रमाला संबोधित करत होते.
नीती आयोगाचे सीईओ म्हणाले की, भारत जगासाठी शिक्षण केंद्र बनू शकतो. सध्या, भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस, आपण चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असू. त्यानंतरच्या वर्षी तिसरी सर्वात मोठी असू, असे ते म्हणाले. आयएमएफच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार सध्या ४.३ ट्रिलियन डॉलर्स आहे. तीन वर्षांत आपण जर्मनी आणि जपानपेक्षा मोठी अर्थव्यवस्था होऊ. २०४७ पर्यंत आपण दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (३० ट्रिलियन डॉलर्स) असू शकतो, असे भाकित नीती आयोगाचे सीईओंनी केले.
सुब्रमण्यम यांनी भारतीय कंपन्यांना, जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची आकांक्षा बाळगण्याचे आवाहन केले. लोकसंख्या कमी होईल, अशी परिस्थिती जगाने पाहिली नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, जपानमध्ये १५,००० भारतीय परिचारिका आहेत, जर्मनी २०,००० भारतीय आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना घेत आहे. कारण त्यांच्याकडे लोक नाहीत आणि तेथील कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली आहे. भारत जगभरातील काम करणाऱ्या वयाच्या लोकांचा एक स्थिर पुरवठादार असेल. ही आमची सर्वात मोठी ताकद असेल, असे ते म्हणाले.