

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग येत्या वर्षातही जगातील मोठ्या देशांच्या तुलनेत वेगवान राहण्याची अपेक्षा आहे. २०२७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७.२ टक्के दराने वाढू शकते, तर चीनचा विकास दर ४.५ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच आर्थिक विकासाच्या वेगाच्या बाबतीत भारत पुढील वर्षीही चीनच्या पुढे राहू शकतो, असे जागतिक गुंतवणूक बँक ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालात म्हटले आहे. २०२७ मध्ये एआयवरील जागतिक खर्च वाढून १.८ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अहवालानुसार, २०२६ मध्येही भारताचा आर्थिक विकास दर ७.९ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. याच्या तुलनेत चीनचा विकास दर ४.४ टक्के राहू शकतो. तर, अमेरिकेची अर्थव्यवस्था २०२६ मध्ये २.३ टक्के आणि २०२७ मध्ये २.४ टक्के दराने वाढू शकते.
एआयवरील खर्च १.८ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचणार
‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालात आर्टिफिशियल इंटेलिजन्सला (एआय) जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचे मोठे कारण मानले गेले आहे. २०२७ मध्ये जगभरात एआयवर होणारा खर्च वाढून १.८ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, तर २०२६ मध्ये हा खर्च सुमारे १.१ ट्रिलियन डॉलर्स राहण्याचा अंदाज आहे. या वाढीचे मोठे कारण अमेरिकेत हार्डवेअरवर होणारी गुंतवणूक आहे. अहवालानुसार, या क्षेत्रात सुमारे ५०० अब्ज डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक होऊ शकते. यात एआयशी संबंधित चिप्स, सर्व्हर व इतर तांत्रिक उपकरणांवर होणाऱ्या खर्चाचा समावेश आहे. अहवालानुसार, २०२७ मध्ये एआयवर होणाऱ्या गुंतवणुकीमुळे जागतिक जीडीपी वाढीत सुमारे ०.४ टक्का अंकांचे योगदान राहू शकते. तर, अमेरिकेच्या आर्थिक विकास दरात याचे योगदान सुमारे ०.६ टक्का अंक राहण्याचा अंदाज आहे. तथापि, सेमीकंडक्टरमधील गुंतवणूक व त्याच्याशी संबंधित एआयनिर्यातीच्या गणनेतील त्रुटी लक्षात घेतल्यानंतर हा अंदाज लावण्यात आला आहे.
जगाचा जीडीपी २.८ टक्के राहू शकतो
‘गोल्डमन सॅक्स’च्या मते, जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर २०२७ मध्ये वाढून २.८ टक्के होऊ शकतो, तर २०२६ मध्ये तो २.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. यामागे ऊर्जेच्या किमतीत घट आणि एआय क्षेत्रातील सातत्याने वाढणारी गुंतवणूक ही प्रमुख कारणे असतील. ऊर्जा स्वस्त झाल्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि आर्थिक घडामोडींना चालना मिळू शकते.
ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईचा उच्चांक; दर १२.२९ टक्क्यांवर
नवी दिल्ली : इंधन, वीज आणि अखाद्य वस्तूंच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे देशाचा घाऊक महागाई दरऑक्टोबर २०२६ मध्ये १२.२९ टक्क्यांवर पोहोचला आहे. २०२२-२३ या सुधारित आधारभूत वर्षानुसार हा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. सप्टेंबरमध्ये हा दर ११.३९ टक्के इतका होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई सप्टेंबरमधील २५.८५ टक्क्यांवरून थेट ३२.८४ टक्क्यांपर्यंत उसळली आहे. अखाद्य वस्तूंचा महागाई दर ११.६९ टक्के, तर अन्नधान्य महागाई दर ८.२६ टक्क्यांवर गेला आहे. खनिज तेले, कच्चे पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि रसायनांच्या वाढलेल्या किमती या दरवाढीला प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या आहेत. मात्र, उत्पादित वस्तूंची महागाई किंचित कमी होऊन ९.५४ टक्क्यांवर आली.