

नवी दिल्ली; पीटीआय : सर्व अर्थतज्ज्ञांचे अंदाज चुकवत भारतीय अर्थव्यवस्थेने जुलै ते सप्टेंबर या आर्थिक वर्षातील दुसर्या तिमाहीत तब्बल 8.2 टक्क्यांनी प्रगती केली असून, देशवासीयांनी जोरदार खरेदी करत अमेरिकन शुल्कवाढीमुळे बसलेल्या हादर्याला निष्प्रभ केले. त्यामुळे अर्थगती वेगाने वाढण्यास मदत झाल्याचे समोर आले आहे.
एप्रिल ते जुलै-2025 च्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 7.8 टक्क्यांनी वाढले होते. त्यामुळे सहामाही ‘जीडीपी’ 8 टक्क्यांवर गेला असल्याची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने शुक्रवारी (दि. 28) जाहीर केली. सरकारचा पायाभूत सुविधांवरील खर्च, ग्रामीण अर्थव्यवस्थेने घेतलेली उभारी आणि देशांतर्गत मागणीमुळे अर्थव्यवस्थेने झेप घेतली. खासगी भांडवली गुंतवणूक बेताची असताना आणि अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के शुल्कवाढीमुळे निर्यात घसरूनही अर्थव्यवस्थेने कमालीची लवचिकता दाखविली आहे.
वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) सुधारित दर 22 सप्टेंबरला नवरात्रीपासून लागू करण्यात आले. ऑगस्ट महिन्यातच हे दर जाहीर झाले होते. त्यानंतरच्या कर स्थित्यंतर काळात मागणी बेताची होती. सुधारित दर जाहीर झाल्यानंतर नागरिकांनी जोरदार खरेदी केल्याने वाहन आणि किरकोळ विक्री क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली.
निम्मा वाटा मागणीचा
‘जीडीपी’मध्ये 60 टक्के वाटा हा देशांतर्गत मागणीचा असतो. त्यातच जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत वाढ नोंदविण्यात आली. उत्पादन क्षेत्राने या कालावधीत 9.1 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदविली. गतवर्षी याच कालावधीत उत्पादन क्षेत्राची वाढ अवघी 2.2 टक्के होती. कृषी आणि कृषिपूरक उद्योगाने 3.5, वित्त, रिअल इस्टेट आणि प्रोफेशनल सेवा देणार्या क्षेत्राने 10.2 टक्क्यांची आणि इलेक्ट्रिक, गॅस, पाणीपुरवठा अशा उपयुक्त सेवा क्षेत्राने 4.4 टक्क्यांची वाढ नोंदविली.
...अशी झाली रुपयात उलाढाल
जुलै ते सप्टेंबर-2025 या तिमाहीत गतवर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत अर्थव्यवस्थेची वाढ 44.94 वरून 48.63 लाख कोटी रुपयांवर गेली. म्हणजेच तिमाही 8.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, एप्रिल ते सप्टेंबर-2024 च्या तुलनेत यंदा एप्रिल ते सप्टेंबर-2025 या कालावधीत अर्थव्यवस्थेचा आकार 89.35 वरून 96.52 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या सहामाहीत 8 टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे.