

indian air force day varanasi air show modi wings over ganga
पुढारी ऑनलाईन : भारतीय हवाई दलाच्या ९४ व्या स्थापना दिनानिमित्त वाराणसीमध्ये 'विंग्स ओव्हर गंगा' या संकल्पनेवर आधारित भव्य हवाई प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
भारतीय हवाई दलाच्या ९४ व्या स्थापना दिनानिमित्त आज वाराणसीच्या आकाशात शौर्य आणि पराक्रमाचे नेत्रदीपक दर्शन घडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी सुमारे १२ वाजेपर्यंत या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते भारतीय हवाई दलाच्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त 'विंग्स ओव्हर गंगा' या संकल्पनेवर आयोजित हवाई प्रात्यक्षिकांचा आनंद घेणार आहेत.
तीन दिवसीय एअर शोला गुरुवारी सुरुवात झाली होती. राज्यातील विधान परिषद निवडणुकीमुळे शुक्रवारी कोणतेही हवाई प्रात्यक्षिक झाले नव्हते. या हवाई प्रात्यक्षिकांमध्ये तेजस, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) प्रचंड, SU-30MKI आणि राफेल यांसारख्या लढाऊ विमानांसह वाहतूक विमानांचाही समावेश असणार आहे.
भारतीय नौदल आणि लष्कराची विमानेही होणार सहभागी
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हवाई प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय नौदल आणि भारतीय लष्कराची विमानेही सहभागी होणार आहेत. यामधून तिन्ही दलांमधील संयुक्त मोहिमांचे (जॉइंट ऑपरेशन्स) प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमात भारतीय हवाई दलाची प्रमुख प्रात्यक्षिक पथके असलेली 'सूर्य किरण एरोबॅटिक टीम' आणि 'सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम'देखील सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विशेष तयारी
नमो घाटावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थाही अधिक कडक केली आहे. संपूर्ण शहराची ३२ झोन, ५० सेक्टर आणि ८० सब-सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली असून, सुरक्षेसाठी सुमारे ११,९०० सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पोलीस लाइनपासून नमो घाटापर्यंत ठिकठिकाणी स्वागत केंद्रे उभारण्यात आली आहेत. ढोल-नगाऱ्यांचा गजर, डमरू पथकांचे वादन, शंखनाद आणि सांस्कृतिक नृत्यांसह 'जय श्रीराम' आणि 'हर हर महादेव'च्या जयघोषाने काशीतील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण करण्याची तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या प्रवासमार्गावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
वाराणसीनंतर पंतप्रधान मोदी भुवनेश्वरला जाणार
वाराणसीतील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशातील भुवनेश्वरला रवाना होणार आहेत. भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान मोदी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करणार आहेत.