

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबतच्या व्यापारी संबंधांवरून भारताला ‘मृत अर्थव्यवस्था’ संबोधल्यानंतर केंद्र सरकारने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारत ही ‘सर्वात वेगाने वाढणारी’ अर्थव्यवस्था असून, काही वर्षांतच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे सरकारने ठणकावून सांगितले आहे.
लोकसभेत बोलताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले की, भारत एका दशकापेक्षा कमी काळात ‘फ्रजाईल फाईव्ह’ (नाजूक पाच) अर्थव्यवस्थांमधून बाहेर पडला आणि आता जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे.
ते म्हणाले, एका दशकापेक्षा कमी काळात भारत ‘फ्रजाईल फाईव्ह’ अर्थव्यवस्थांमधून बाहेर पडला आहे. सुधारणा, शेतकरी, एमएसएमई आणि उद्योजकांच्या कठोर परिश्रमाच्या जोरावर आम्ही 11 व्या क्रमांकावरून जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. अपेक्षा आहे की, काही वर्षांतच आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. आज जागतिक संस्था आणि अर्थतज्ज्ञ भारताकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील एक ‘ब्राइट स्पॉट’ म्हणून पाहत आहेत, असेही ते म्हणाले.
30 जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयातशुल्क लादल्यानंतर भारताने प्रतिक्रिया दिली होती. केंद्र सरकार या निर्णयाच्या परिणामांचा अभ्यास करत आहे आणि राष्ट्रीय हित जपण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे भारताने म्हटले होते.