

Iran-Israel-US Ceasefire
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला विराम मिळाला आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असून भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या पावलामुळे पश्चिम आशियात दीर्घकालीन शांततेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.भारताने आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले की, सध्याच्या संघर्षामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला असून जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापार व्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. विशेषतः होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही भारताने नमूद केले.
तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील 'बॉम्बफेक आणि हल्ले' थांबवल्याचे जाहीर केले. त्यांनी दोन आठवड्यांच्या दुहेरी युद्धविरामाची घोषणा केली असून, इराणने सादर केलेला १० कलमी प्रस्ताव चर्चेसाठी योग्य असल्याचे म्हटले आहे.'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करताना ट्रम्प यांनी नमूद केले की, हा १० कलमी प्रस्ताव कायमस्वरूपी करारासाठी पाया म्हणून काम करेल. त्याच वेळी, अमेरिकेने आपली बहुतेक लष्करी उद्दिष्टे साध्य केली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प म्हणाले, "पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसीम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि त्यांनी इराणवर आज रात्री होणारा विनाशकारी हल्ला रोखण्याची विनंती केल्यामुळे, मी हा निर्णय घेतला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तत्काळ आणि सुरक्षितपणे खुली ठेवण्यास सहमती दर्शवल्यास, मी दोन आठवड्यांसाठी इराणवरील बॉम्बफेक थांबवण्यास तयार आहे."
इराणने अमेरिकेचे हे शांतता प्रस्ताव स्वीकारले असून दोन आठवड्यांसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाची हमी दिली आहे, तसेच लष्करी कारवाया थांबवण्यासही सहमती दर्शवली आहे.इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी 'एक्स'वर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, जोपर्यंत इराणवर हल्ला होत नाही, तोपर्यंत इराण आपल्या लष्करी कारवाया थांबवेल. अराघची यांनी लिहिले, "अमेरिकेने चर्चेसाठी पाठवलेला १५ कलमी प्रस्ताव आणि ट्रम्प यांनी इराणच्या १० कलमी प्रस्तावाचा स्वीकार केल्याच्या पार्श्वभूमीवर, मी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करतो की, जर इराणवर हल्ले थांबवले गेले, तर आमचे सशस्त्र दल त्यांच्या बचावात्मक कारवाया थांबवेल. दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी, इराणच्या सशस्त्र दलांशी समन्वय साधून आणि तांत्रिक बाबींचा विचार करून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास शक्य होईल.
दरम्यान, शुक्रवारी इस्लामाबादमध्ये इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करणार आहेत, तर अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स करणार आहेत. या दोन्ही देशांमधील चर्चेकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.