

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दहशतवादाचा वापर शस्त्र म्हणून करत राहाल तोपर्यंत तुम्हाला पाण्याचा थेंबही मिळणार नाही, अशा शब्दांत सिंधू जल कराराबाबत भारताने पाकिस्तानला खडसावले आहे.
पाकिस्तानातील अनेक गावे आणि शेती पाण्याविना सुकली असून तेथील जनता तहानलेली आहे. या परिस्थितीनंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला पीडित दाखवत ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळण्याचा आणि अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने आपली भूमिका ठाम ठेवली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अत्यंत आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानसोबतचा ऐतिहासिक सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानच्या दिशेने जाणारे नद्यांचे पाणी रोखले. भारताच्या या धोरणात्मक निर्णयामुळे पाकिस्तानात पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानला थेट शब्दांत इशारा दिला की, सिंधू जल करार आता पूर्वस्थितीत लागू होणे अशक्यप्राय आहे. पाकिस्तानने पाणीटंचाई दूर करण्यासाठी दोन मुख्य अटी पूर्ण कराव्यात. पहिली अट म्हणजे पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग आणि दहशतवाद्यांची साथ पूर्णपणे सोडली पाहिजे आणि दुसरी म्हणजे आपल्या जमिनीवरून चालणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांवर ठोस कारवाई केली पाहिजे. पाकिस्तानात खुलेआम फिरणारे दहशतवादी हे तिथल्या सरकारच्या खुलेआम पाठिंब्यामुळेच मोकाट आहेत.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात किंवा लवाद मध्यस्थांकडे जाऊन पाकिस्तानला कोणतीही मदत मिळणार नाही. त्यांनी स्वतःच्या चुकीच्या धोरणांचे फळ भोगले पाहिजे. त्यांना पाण्याची एवढी गरज होती, तर त्यांनी पाणी साठवण्यासाठी योग्य यंत्रणा का उभारली नाही, असा सवालही भारताने उपस्थित केला.
जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये सिंधू जल करार झाला. या करारानुसार, पूर्वेकडील रावी, बियास आणि सतलज नद्यांचे पाणी भारताला तर पश्चिमेकडील सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले. पश्चिमेकडील नद्यांवर भारताला विशिष्ट प्रकल्पांची परवानगी आहे. पाकिस्तानने नेहमीच या करारातील तरतुदींचा भंग करत भारताच्या जलप्रकल्पांना विरोध दर्शवला. आता भारताने आपली रणनीती बदलली असून दहशतवादाचा नायनाट झाल्याशिवाय पाकिस्तानला एक थेंबही पाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे.