

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत आणि अमेरिकेदरम्यान समंजस व्यापार मिळवण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. परंतु यामध्ये आमच्या तळाच्या आणि ‘रेड लाईन्स’चा आदर होणे आवश्यक आहे. दोन्ही पक्ष अजूनही व्यापाराच्या चर्चेत कोणत्याही ‘लँडिंग ग्राऊंड’वर पोहोचले नाहीत, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना सांगितले.
जयशंकर यांनी अमेरिकेने भारतावर लादलेल्या काही शुल्कांवर आणि विशेषतः रशियन इंधन खरेदीवर लावलेल्या अतिरिक्त शुल्कावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, रशियाकडून ऊर्जा खरेदी केल्याबद्दल भारतावर लादलेले 50 टक्के शुल्क अत्यंत ‘अन्यायकारक’ आहे आणि ते बाजार अर्थशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांना आव्हान देणारे आहे. ऊर्जा दरांमध्ये मोठी तफावत असताना आणि बाजारात स्पर्धात्मकता असताना अशा प्रकारचे शुल्क लावणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अमेरिकेला कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी भारतीय बाजारपेठेत प्रवेश हवा आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, भारतीय शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालक यांच्यावर विपरीत परिणाम करणार्या कोणत्याही धोरणाविरोधात सरकार भिंतीसारखे उभे राहील. जयशंकर यांनी मान्य केले की, भारत-अमेरिका संबंधांमध्ये काही प्रश्न आहेत. पण त्यांनी भर दिला की, संबंधांचा मोठा भाग नेहमीप्रमाणे किंवा त्याहून अधिक चांगला सुरू आहे. क्वाड गटाबद्दलच्या (अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया) प्रश्नावर त्यांनी सांगितले की, क्वाड जिवंत आहे आणि सुस्थितीत आहे.
आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी भर दिला की भारताचे लक्ष्य केवळ आपले हित जपण्याचे नाही, तर या जागतिक बदलांमध्ये देशाला पुढच्या स्तरावर कसे घेऊन जायचे हे आहे. यासाठी उत्पादन क्षेत्रातील गमावलेले दशक भरून काढणे आणि सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने, ड्रोन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.