सुरक्षा कवच होणार आणखी अभेद्य! भारत ३१ 'प्रीडेटर ड्रोन'ची करणार खरेदी

अमेरिकेबरोबर तब्‍बल ३२ हजार कोटी रुपयांच्‍या करारावर स्‍वाक्षरी
Predator drones
प्रातिनिधिक छायाचित्र(Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशाची सुरक्षा कवच आणखी अभेद्य होणार आहे. भारत अमेरिकेकडून प्रिडेटर ड्रोन खरेदी करणार आहे. आज (१५ ऑक्‍टोबर) उभय देशांमध्‍ये ३१ प्रीडेटर ड्रोन खरेदी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारावर भारत 32 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. मागील आठवड्यात सुरक्षाविषयक केंद्रीय समितीने ३१ प्रीडेटर ड्रोन खरेदीला मंजुरी दिली होती. विशेष म्हणजे याच ड्रोनच्‍या मदतीने अमेरिकेने मॉस्‍ट वॉण्‍डेट दहशतवादी ओसामा बिन लादेन, अल जवाहिरीला ठार केले होते. आता हे ड्रोन भारतीय लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत.

संरक्षण दलातील तिन्‍ही दलांना मिळणार 'प्रीडेटर ड्रोन'

भारत आणि अमेरिका यांच्यातील विदेशी लष्करी विक्री करारांतर्गत, अमेरिकन निर्माता जनरल ॲटोमिक्स एरोनॉटिकल सिस्टीम्स (GA-ASI) सोबत ड्रोनसाठी करार करण्यात आला आहे. भारतीय नौदलाला १५ ड्रोन मिळण्याची शक्यता आहे. तर लष्कर आणि हवाई दलाला प्रत्येकी आठ 'स्काय गार्डियन' प्रीडेटर ड्रोन मिळण्याची शक्यता आहे. हे ३१ ड्रोन भारताला उपलब्ध होताच देशाच्या तिन्ही सेना संयुक्तपणे त्यांचा वापर तात्काळ सुरू करू शकतील.चेन्नईजवळील INS राजाली, गुजरातमधील पोरबंदर, सरसावा आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूर या चार संभाव्य ठिकाणी भारत ड्रोन बसवणार असल्‍याची प्राथमिक माहिती आहे.

31 प्रीडेटर ड्रोनसाठी 32,000 कोटी रुपयांचा करार

डेलावेअर येथे आयोजित क्वाड लीडर्स समिटवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी प्रीडेटर ड्रोनच्या अधिग्रहणाबाबत चर्चा केली होती. यानंतर अवघ्‍या एका महिन्‍यात भारत आणि अमेरिकातील खरेदी करारावर स्‍वाक्षरीही झाल्‍या आहेत. जनरल ॲटॉमिक्सद्वारे निर्मित 31 प्रीडेटर MQ-9B हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स यूएव्हीच्या खरेदीसाठी भारताने अमेरिकेशी करार केला आहे. 31 ड्रोनसाठी 32,000 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी झाली आहे. या करारामुळे भारतीय सशस्त्र दलांची देखरेख क्षमता वाढणार आहे.

काय आहेत 'प्रीडेटर ड्रोन'ची वैशिष्ट्ये?

  • अमेरिकेचे प्रीडेटर ड्रोन ज्याला एमक्यू ९ रीपर असेही म्हणतात.

  • सलग ३६ तास हवेत उडण्‍याची क्षमता.

  • ताशी ४४२ किमी कमाल वेगासह ५० हजार फूट उंचीवर उडू शकते.

  • व्‍यावसायिक विमानापेक्षा अधिक उंचीवर उड्‍डाणाची क्षमता

  • सलग ३५ तास लक्ष्‍यांवर नजर ठेवू शकते. तसेच १७०० किलो माल वाहून नेऊ शकते.

  • चार क्षेपणास्त्रे आणि सुमारे ४५० किलो बॉम्ब वाहून नेण्‍याची क्षमता.

  • हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसोबतच हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचाही पर्याय.

अमेरिकेने 'प्रीडेटर ड्रोन'च्‍या सहाय्‍याने अल जवाहिरीचा केला होता खात्‍मा

जुलै 2022 मध्ये अमेरिकेने या ड्रोनमधून हेलफायर क्षेपणास्त्र डागून अल कायदाचा दहशतवादी अयमान अल जवाहिरीचा खात्मा केला होता. हे ड्रोन हेलफायर मिसाईल तसेच 450 किलो स्फोटकांसह उड्डाण करू शकते. जनरल ॲटॉमिक्स या प्रीडेटर ड्रोनची निर्मिती करणाऱ्या कंपनीने या ड्रोनचे पार्ट्स बनवण्यासाठी भारत फोर्ज या भारतीय कंपनीसोबत यापूर्वीच करार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news