

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवाः देशातील बेरोजगारीचा दर घटला असल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा कारंदालाजे यांनी सोमवारी लोकसभेत दिली. बेरोजगारीचा दर ३.२ टक्क्यांपर्यंत घसरला आहे, असे त्या म्हणाल्या. एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या की, २०१९-२० या आर्थिक वर्षात बेरोजगारीचा दर ४.८ टक्के होता. जो २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३.२ टक्क्यांवर आला आहे. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध रोजगार निर्मिती योजनांमुळे बेरोजगारीचा दर कमी झाला आहे. याशिवाय, रोजगार क्षमता वाढवण्यासाठी, केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षात २ लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चासह ४.१ कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी ५ योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर केले आहे, असे त्यांनी सांगितले.
आरबीआयच्या आकडेवारीचा हवाला देत त्या म्हणाले की, २०१७-१८ मध्ये ४७.५ कोटी रोजगार असलेल्या देशातील रोजगाराची संख्या २०२३-२४ मध्ये ६४.३३ कोटीपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, सप्टेंबर २०१७ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान ७ कोटींहून अधिक लोक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत सामील झाले आहेत.