

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी आगामी 40 ते 50 वर्षांत भारत हा जगातील महत्त्वाचा देश राहणार असून भारतीय पंतप्रधान जगातील मुक्त लोकशाही असलेल्या देशांचे नेतृत्व करेल, असे वक्तव्य केले आहे. वर्ल्ड समिट 2025 मध्ये ते बोलत होते.
अबॉट म्हणाले की, चीन लोकशाही विरोधक असून भारताकडे तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या चीनकडे नाहीत. त्या म्हणजे, लोकशाही, कायद्याचे राज्य आणि इंग्रजी भाषा. भारताच्या कोणत्याही शहरात गेल्यास मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा दिसून येतात. भारताला विश्वासू भागीदार असून भारताने ऑस्ट्रेलिया व युनायटेड किंगडमसोबत केलेल्या व्यापार कराराचे त्यांनी कौतुक केले. लोकशाही जग आता हळूहळू चीनकडून भारताकडे झुकत आहे.
मी ट्रम्प यांचा समर्थक आहे, पण भारतावर त्यांनी रशियन तेल खरेदीप्रकरणी 25 टक्के दंडात्मक शुल्क लावून चुकीचा निर्णय घेतला. भारताऐवजी चीनसारखी देश जे अधिक तेल खरेदी करतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पाकिस्तानात चांगले लोक आहेत, पण अजूनही ते एक लष्करी मानसिकतेचे इस्लामी राष्ट्र आहे. भारत वेगळा आहे. अमेरिका पाकिस्तानसोबत संबंध ठेवू शकते, पण तिने आपले खरे मित्र कोण हे ओळखले पाहिजे, असेही अॅबॉट म्हणाले.