

नवी दिल्ली; पीटीआय : पुढील दोन कॅलेंडर वर्षे जागतिक आर्थिक स्थिती लवचिक राहील. मात्र, जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपले स्थान कायम राखेल. कॅलेंडर वर्ष 2026 आणि 2027 मध्ये 6.5 टक्क्यांहून अधिक अर्थगती राखण्यात भारताला यश येईल, असा विश्वास ‘गोल्डमन सॅक्स’च्या आर्थिक विश्लेषण अहवालात नोंदविण्यात आला आहे.
आटोक्यात राहिलेली महागाई आणि जगातील अनेक देशांच्या आर्थिक पतधोरणात होत असलेली सुधारणा, यामुळे 2026 मध्ये जागतिक अर्थगती 2.8 टक्के राहील. यापूर्वी अडीच टक्क्यांचा अंदाज वर्तविण्यात आला होता. शुल्कवाढीचे कमी झालेले अडथळे, करकपात आणि वित्तीय स्थितीत सुधारणा होत असल्याने अमेरिका पूर्वी वर्तविलेल्या अंदाजाच्या तुलनेत 2 वरून 2.6 टक्क्यांवर झेप घेईल, असेही अहवालात म्हटले आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताची कामगिरी चांगली राहील.
देशांतर्गत मागणी आणि त्याला पूरक असलेल्या धोरणांमुळे भारताची अर्थगती वाढेल, असे मतही अहवालात नोंदविण्यात आले आहे. भारताची अर्थव्यवस्था 2026 मध्ये 6.7 आणि 2027 मध्ये 6.8 टक्क्यांनी वाढेल. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल. तर, याच कालावधीत चीनची आर्थिक प्रगती अनुक्रमे 4.8 आणि 4.7 टक्क्यांनी होईल. देशांतर्गत मागणी, पायाभूत सुविधांवरील खर्च, जागतिक व्यापार अडथळ्यांची कमी बसलेली झळ, यामुळे चीनची आर्थिक वाढ शक्य होईल, असेही ‘गोल्डमन सॅक्स’ने म्हटले आहे. त्या तुलनेत अमेरिका आणि युरोपची आर्थिक वाढ मध्यम गतीने होईल.
महागाई राहील आटोक्यात
वस्तूंच्या कमी किमती, सुधारलेली उत्पादकता आणि पुरवठा साखळीतील अडथळे कमी झाल्यामुळे 2026 च्या अखेरपर्यंत बहुतेक अर्थव्यवस्थांमध्ये किमतींवरील असलेला दबाव कमी होईल. त्याचा फायदा विकसनशील देशांतील केंद्रीय बँकांना अनुकूल धोरणात्मक भूमिका घेण्यासाठी होईल. भारतासारख्या देशांना त्याचा आणखी फायदा होईल.