

नवी दिल्ली: भारतात प्रतिभा असली तरी, तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानात औद्योगिक कौशल्य निर्माण करण्यासाठी पोकळ घोषणा नाही तर ठोस कार्यवाहीची आवश्यकता आहे, अशी टिका कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये, राहुल गांधींनी चीनने ड्रोनचे उत्पादन कसे सुरू केले आहे यावर प्रकाश टाकला. हे उत्पादन जगभरात युद्धात क्रांती घडवत आहे, असे ते म्हणाले. भारताला या क्षेत्रात स्पर्धात्मक बनण्यासाठी एक धोरण विकसित करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, दुर्दैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तंत्रज्ञान समजण्यात अपयशी ठरले आहेत. ते ‘एआय’वर 'टेलीप्रॉम्प्टर' भाषण देत आहेत. यावेळी आपल्या देशाचे स्पर्धक नवीन तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवत आहेत. भारताला पोकळ घोषणांची नाही तर मजबूत उत्पादन आधाराची आवश्यकता आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटले आहे. ड्रोनने युद्धात क्रांती घडवून आणली आहे, बॅटरी, मोटर्स आणि ऑप्टिक्स एकत्रित करून युद्धभूमीवर अभूतपूर्व कार्य केले जात आहे. मात्र, ड्रोन हे केवळ एक तंत्रज्ञान नाही तर ते एका मजबूत औद्योगिक प्रणालीद्वारे तयार केलेले तळापासून वरपर्यंतचा नवोपक्रम आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
भारतात प्रचंड प्रतिभा, प्रमाण आणि प्रेरणा आहे. आपल्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी आणि भारताला भविष्यात घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे स्पष्ट दृष्टी असली पाहिजे आणि खऱ्या औद्योगिक कौशल्याची निर्मिती केली पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस नेत्याने पोस्टसोबत ड्रोन तंत्रज्ञानावरील नऊ मिनिटांचा व्हिडिओ देखील जोडला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की भविष्यासाठी असे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारताकडे प्रतिभा आणि अभियांत्रिकी कौशल्ये आहेत.