Gurugram Skyscraper | गुरुग्राममध्ये उभारणार देशातील उंच इमारत; ग्लोबल सिटीत ७०० मीटर उंचीचा इमला

Gurugram Skyscraper |
Gurugram Skyscraper | गुरुग्राममध्ये उभारणार देशातील उंच इमारत; ग्लोबल सिटीत ७०० मीटर उंचीचा इमला
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हरियाणातील गुरुग्राममध्ये भारतातील सर्वात उंच इमारत उभी राहू शकते. ‘हरियाणा स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने (एचएसआयआयडीसी) प्रस्तावित एक हजार एकरच्या ‘ग्लोबल सिटी’ विकास क्षेत्रात ६.७ एकरचा भूखंड निश्चित केला आहे. येथे ६२० ते ७०० मीटर उंचीच्या ‘मिक्स्ड-यूज’ (मिश्र-वापर) टॉवरची योजना आखली जात आहे.

हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला, तर ही वास्तू भारतातील सर्वात उंच इमारत ठरेल. तसेच, जगातील सर्वात उंच टॉवर्सच्या यादीतही या इमारतीला स्थान मिळेल. ‘ग्लोबल सिटी’ प्रकल्प हा हरियाणा सरकारचा एक प्रमुख ‘मिक्स्ड-यूज’ (मिश्र-वापर) शहरी विकास प्रकल्प आहे. द्वारका एक्‍स्‍प्रेस वेच्या जवळ सुमारे एक हजार एकरवर पसरलेला हा प्रकल्प एक एकात्मिक व्यावसायिक, वाणिज्यिक, निवासी आणि संस्थात्मक केंद्र म्हणून विकसित केला जाणार आहे. जागतिक कंपन्या, वित्तीय संस्था आणि तंत्रज्ञान कंपन्यांना आकर्षित करणे हा यामागचा उद्देश आहे. या इमारतीत व्यावसायिक, हॉटेल, किरकोळ विक्री (रिटेल) आणि निवासी घटकांचा समावेश असू शकतो. अंतिम तपशील अद्याप जाहीर व्हायचा आहे.

आघाडीच्या विकसकांशी चर्चा

प्रकल्पाचा मास्टर प्लॅन आणि विकास धोरण निश्चित करण्यासाठी हरियाणा सरकारने गेल्या दोन-तीन वर्षांत नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर), बंगळूर आणि मुंबईतील आघाडीच्या रिअल इस्टेट विकसकांशी चर्चा केली आहे. बाजारातील मागणीचा अंदाज घेणे, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करणे आणि एक वैशिष्ट्यपूर्ण (लँडमार्क) वास्तू उभारण्याच्या शक्यतेचे मूल्यांकन करणे, या उद्देशाने या चर्चा करण्यात आल्या आहेत.

मुंबईत आहे देशातील उंच इमारत

भारतातील सध्याच्या सर्वात उंच इमारतीचा मान मुंबईतील वरळी येथील ‘पॅलेस रॉयल’ला जातो. तिची उंची ३२० मीटर असून, त्यात ८८ मजले आहेत. दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील सध्याची सर्वात उंच इमारत नोएडा येथील ‘सायबरथम टॉवर ए’ ही असून, तिची उंची २१३.७ मीटर आहे. ‘काऊन्सिल ऑन टॉल बिल्डिंग्ज अँड अर्बन हॅबिटॅट’च्या आकडेवारीनुसार, गुरुग्राममधील पूर्ण झालेली सर्वात उंच इमारत ‘ट्रम्प टॉवर्स दिल्ली एनसीआर’ असून, तिची उंची २०१.५३ मीटर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news