

मॉस्को; वृत्तसंस्था : भारताची ऊर्जा सुरक्षा जपण्यासाठी आणि राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून, सर्वात स्पर्धात्मक स्रोतांकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवले जाईल, असे रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी स्पष्ट केले आहे. रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवरून अमेरिकेचा दबाव वाढत असताना, भारताने आपल्या भूमिकेवर ठाम राहत राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.
रशियाची सरकारी वृत्तसंस्था तासला दिलेल्या मुलाखतीत राजदूत विनय कुमार यांनी भारताचे ऊर्जा धोरण हे बाजारातील परिस्थिती आणि देशातील 140 कोटी नागरिकांच्या गरजांवर अवलंबून असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले, भारतीय कंपन्यांना जिथून सर्वोत्तम आणि किफायतशीर सौदा मिळेल, तिथून त्या तेल खरेदी करणे सुरूच ठेवतील. सध्याची परिस्थिती हीच आहे.
राजदूत कुमार यांनी सांगितले की, आमचे ध्येय 140 कोटी लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे आहे, हे आम्ही स्पष्ट केले आहे. रशियासोबतच इतर अनेक देशांसोबतची आमची भागीदारी जागतिक तेल बाजारात स्थिरता टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
राजदूत विनय कुमार यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, स्वतः अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशही रशियासोबत व्यापार करत आहेत. भारत आणि रशियामधील व्यापार हा परस्पर हितसंबंध आणि बाजारातील घटकांवर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेने भारताच्या रशियन तेल खरेदीवर टीका तीव्र केली आहे. या खरेदीमुळे मिळणार्या महसुलाचा वापर रशिया युक्रेनमधील लष्करी कारवाईसाठी करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. तथापि, भारताने हा आरोप वेळोवेळी फेटाळून लावला आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही अमेरिकेच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले होते. ते म्हणाले होते, तुम्हाला भारताकडून तेल किंवा शुद्ध उत्पादने खरेदी करण्यात अडचण असेल, तर खरेदी करू नका. तुम्हाला कोणीही जबरदस्ती करत नाही; पण युरोप खरेदी करतो, अमेरिका खरेदी करते. त्यामुळे तुम्हाला नाही आवडत, तर तुम्ही खरेदी करू नका.