

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सेमीकंडक्टरची देशांतर्गत मागणी 24 अब्ज डॉलरवर गेली असून, 2030 पर्यंत त्यात 120 अब्ज डॉलरपर्यंत वाढ होईल, अशी माहिती एल अँड टी सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार यांनी दिली.
नव्याने तयार करण्यात आलेल्या सेमीकंडक्टर प्रॉडक्ट लीडरशिप फोरममध्ये ते बोलत होते. भारत आतापर्यंत सेमीकंडक्टरचे उत्पादन करत नाही. मात्र, आपला वापर 24 अब्ज डॉलरचा आहे. त्यात वाढ होत आहे. या फोरमच्या माध्यमातून देशाला सेमीकंडक्टरनिर्मितीत आघाडीवर नेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, असे कुमार म्हणाले. सेमीकंडक्टर डिझाईन, आयपी क्रिएशन आणि मूल्यवर्धित साखळीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सेमीकंडक्टरनिर्मितीसाठी अनेक कंपन्यांचा सहयोग आणि सहभाग आवश्यक आहे. त्यातून एक परिसंस्था आकाराला येईल. त्यामुळे शेकडो कंपन्या देशात उभारू शकू, असे कुमार म्हणाले.
सेमीकंडक्टर क्षेत्र आकार घेत असून, निर्माण होणार्या पुरवठा साखळीत 5 लाख रोजगार संधी असतील. यात मोठ्या प्रमाणावर अभियंते सामावून घेण्याची या क्षेत्राची क्षमता आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने 10 सेमीकंडक्टर प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यात 1 लाख 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, पंजाब, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात हे प्रकल्प होतील.