

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतात 2024 मध्ये 1 लाख 77 हजार 177 रस्ते अपघात मृत्यूंची नोंद झाली, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गुरुवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. हा आतापर्यंतचा एका वर्षातील सर्वाधिक आकडा असून तो या संकटाची भीषणता दर्शवतो. जागतिक आकडेवारीनुसार, 2030 पर्यंत मृत्यूंची संख्या निम्म्याने कमी करण्याचे संयुक्त राष्ट्रांचे लक्ष्य भारत चुकवण्याच्या मार्गावर आहे.
राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2024 या कॅलेंडर वर्षात देशातील सर्व प्रकारच्या रस्त्यांवर एकूण 1,77,177 रस्ते अपघात मृत्यूंची नोंद झाली, अशी माहिती सरकारने संसदेत दिली. वाहन सुरक्षेबाबत सरकारने एअरबॅग, लहान मुलांसाठी सुरक्षा हार्नेस, रिव्हर्स पार्किंग अलर्ट, स्पीड लिमिटिंग उपकरणे, भारत क्रॅश रेटिंग, एटीएस केंद्रांवर स्वयंचलित फिटनेस चाचणी आणि 2027 पासून मध्यम व जड वाहनांसाठी लेन डिपार्चर वॉर्निंग आणि ड्रायव्हर ड्राऊझिनेस अलर्ट यांसारख्या अनिवार्य वैशिष्ट्यांवर नवीन नियम लागू केल्याचे नमूद केले.
आपत्कालीन सेवा सुधारणांमध्ये सुधारित गुड सॅमॅरिटन ‘राह वीर’ योजनेचा समावेश आहे, ज्यात बक्षीस रक्कम 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच हिट अँड रन पीडितांसाठी वाढीव भरपाई आणि या वर्षाच्या सुरुवातीला घोषित केलेल्या सर्व रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचारांची सोय करण्यात आली आहे.
लाखामागे 11 जणांचा मृत्यू
मंत्रालयाने सांगितले की, भारतातील मृत्यू दर प्रति लाख लोकसंख्येमागे 11.89 आहे. जागतिक रस्ते आकडेवारीतून मिळालेल्या तुलनात्मक आकडेवारीनुसार चीनचा दर 4.3 इतका लक्षणीयरीत्या कमी आहे; तर अमेरिकेत तो 12.76 इतका आहे. जपान आणि युनायटेड किंगडमची आकडेवारी कळवण्यात आलेली नाही, असे लोकसभेतील उत्तरात म्हटले आहे.