

नवी दिल्ली : इंडिया पोस्टने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महसुलात मोठी झेप घेतली आहे. इंडिया पोस्टने 15,296 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या 13,218 कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच महसूल वाढीचा दर 15 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. टपाल विभागाच्या वार्षिक आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही माहिती दिली.
ही वाढ विभागाच्या मुख्य सहा क्षेत्रांमधील उत्तम कामगिरीमुळे झाली आहे. यामध्ये पार्सल, मेल, आंतरराष्ट्रीय मेल, पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक, टपाल जीवन विमा आणि नागरिक केंद्रित सेवांचा समावेश आहे.
ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, इंडिया पोस्ट आता केवळ खर्चाचे खाते न राहता महसूल आधारित संस्था बनत आहे. तथापि लॉजिस्टिक्स क्षमता वाढवणे, पार्सल सेवांचा विस्तार आणि मेल सेवा अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.
तसेच डिजिटल तंत्रज्ञान, डेटावर आधारित निर्णय आणि प्रादेशिक रणनीती ही भविष्यातील यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. ई-कॉमर्स कंपन्यांसोबतची भागीदारी आणि सरकारी सेवांच्या विस्तारामुळे इंडिया पोस्टची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे. कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांनी डाक सेवा, जन सेवा हे ध्येय पुढे नेण्याचे आवाहन केले.
विभागवार वाढलेली टक्केवारी : पार्सल 69 टक्के, टपाल 34, नागरी सेवा 70, टपाल जीवन विमा 25, सेव्हिंग बँक 13 टक्के.