

अहमदाबाद : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. कच्छ सीमेवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करताना तीन ड्रोन पाडले. गुजरातच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून हल्ला होण्याची भीती असल्याने राज्यातील 18 जिल्हे हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत.
राज्यातील सोमनाथ आणि द्वारका मंदिरांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून भूज विमानतळाचा ताबा लष्कराने घेतला आहे आणि राज्याच्या सर्व बंदरांचीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बनासकांठा, कच्छ आणि पाटणच्या सीमावर्ती भागातील गावांमध्ये गुरुवारी रात्री ब्लॅकआऊट करण्यात आले. मात्र, शुक्रवारी सकाळी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर येथील आपत्कालीन ऑपरेशन केंद्रात एक बैठक झाली.
मुख्यमंत्र्यांनी विविध विभागांचे वरिष्ठ सचिव आणि संबंधित जिल्ह्यांचे प्रशासकीय प्रमुख, पोलिस अधिकारी आदींसोबत आढावा बैठक घेतली. सुरक्षेचा विचार करून गुजरातच्या सीमावर्ती गावांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यासह भूज विमानतळ लष्कराकडे सोपवण्यात आले आहे. राज्यातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व आरोग्य कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. याशिवाय राज्यातील ज्योतिर्लिंग सोमनाथ, शक्तिपीठ अंबाजी आणि द्वारका मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सोमनाथ मंदिराला आधीच झेड प्लस सुरक्षा आहे.
याअंतर्गत येथे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. यासोबतच येथे बॉम्ब आणि श्वानपथकेही तैनात केली आहेत. भारतासोबत झालेल्या प्रत्येक युद्धात पाकिस्तानने द्वारकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच द्वारका मंदिराच्या संपूर्ण समुद्री परिसरात सैन्य दल तैनात केले आहे. द्वारका आणि ओखा समुद्रकिनार्यांवरही सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सागरी पोलिसांनीही या समुद्रकिनार्यांवर गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
कच्छमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारांना परत बोलावले आहे. कच्छच्या सीमावर्ती भागातील नारायण सरोवर, जखौ आणि लखपत या सागरी क्षेत्रातील मच्छीमारांच्या सर्व हालचालींवर पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ बंदी घातली आहे.