

नवी दिल्ली : पाकिस्तानची लष्करी आणि दहशतवादी यंत्रणा भारताविरुद्ध थेट लढाईत अपयशी ठरल्यावर आता अत्यंत नापाक आणि नीच पातळीवर गेलेली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने 6 आणि 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
त्यानंतर पाकिस्तानने आता भारतातील विविध धर्मस्थळांना लक्ष्य करत देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आधी गुरुद्वारा, नंतर चर्च आणि आता पाकिस्तानने जम्मूमधील एका मंदिराला लक्ष्य बनवले आहे.
विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी 9 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानने पूंछमधील एका गुरुद्वार्यावर हल्ला केला, ज्यात काही स्थानिक शिखांचे प्राण गेले. त्याचवेळी पाकिस्तानकडून खोट्या बातम्या पसरवून भारताने नानकाना साहिब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप केला.
मिसरी यांनी हे आरोप स्पष्टपणे खोडून काढले आणि सांगितले की, हे पाकिस्तानकडून चालवल्या जाणार्या अपप्रचार मोहिमेचे एक अंग आहे. पाकिस्तानच्या लष्करी धोरणामध्ये धार्मिक ध-ुवीकरणाचे कारस्थान दिसून येते. 7 मे रोजी पूंछमधील एका ख्रिस्ती मिशनरी संस्थेवरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. तसेच शाळा बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली. शनिवार, 10 मे रोजी जम्मूमधील ‘आप शंभू’ मंदिराजवळ मोठा हल्ला झाला.
जम्मू पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा या घटनेची चौकशी करत आहेत. स्थानिक लोकांनी सांगितले की, सकाळी लवकरच मंदिरात हजेरी लावणार्यांची संख्या कमी होती. त्यामुळे मोठी हानी टळली. या घटनेनंतर स्पष्ट झाले की, पाकिस्तान भारतात धार्मिक दंगली भडकवण्याच्या नापाक डावात गुंतलेला आहे. अलीकडेच पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर याचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात त्याने जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचे संकेत दिले होते. हेच धोरण आता प्रत्यक्षात उतरवले जात आहे.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांचे अडथळे दूर करण्यात आले. या दहशतवाद्यांच्या अंत्यविधींना पाक लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, हेच दाखवते की हे संघटनाच पाकिस्तानच्या लष्करासाठी काम करत आहेत. भारत सरकारचा दावा आहे की, पाकिस्तान देशात धार्मिक तणाव वाढवून अस्थिरता पसरवू इच्छित आहे. कारण, थेट युद्धात तो भारताशी कधीच सामना करू शकत नाही; पण 140 कोटी भारतीयांचे एकत्रित बळ आणि निर्धार पाहता पाकिस्तानचा हा डावदेखील अपयशी ठरणार, हे निश्चित आहे.