

नवी दिल्लीः भारताने पाकिस्तानातील सरगोधा, नूर खान (रावळपिंडी), शोरकोट आणि चकवाल येथील हवाई दलाच्या तळांवर केलेल्या जोरदार हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये शनिवारी पहाटेपासून प्रचंड खळबळ उडाली आहे. या एरियल स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड अफरातफरीची स्थिती निर्माण झाली.
देशभरात एअर इमर्जन्सी घोषित करण्यात आली. पाकिस्तानच्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सर्व उड्डाणे थांबवण्याचे आदेश दिले. कारण, म्हणून ‘सुरक्षा कारणे’ नमूद करण्यात आली आहेत. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात इंधन संकटही निर्माण झाले असून खुद्द राजधानी इस्लामाबादमध्येही सर्व पेट्रोल पंप बंद झाले आहेत.
स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजेपर्यंत लाहोर, इस्लामाबाद आणि पेशावर यांसारख्या प्रमुख शहरांवरील हवाई क्षेत्र बंद ठेवण्यात आले, असे सरकारने जारी केलेल्या NOTAMs ( Notice to Airmen) मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. इस्लामाबाद व रावळपिंडीतील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले, ज्यामुळे आणखी एक अंतर्गत सुरक्षा संकट असल्याच्या चर्चांना उधाण आले. मध्यरात्रीनंतर पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या; मात्र पंप बंद असल्याने लोकांना निराश व्हावे लागले. पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आणि शहर प्रशासनाने ‘सुरक्षा प्रोटोकॉल’ व ‘आपत्कालीन तयारी’ यांचा हवाला दिला.