

नवी दिल्ली : भारताने आर्थिक क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आर्थिक पुनरावलोकनानुसार, भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला आहे. येत्या तीन वर्षांत जर्मनीलाही मागे टाकून तिसर्या क्रमांकावर पोहोचण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
केंद्राच्या वतीने सोमवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सध्या भारताचा जीडीपी 4.18 ट्रिलियन डॉलर्स असून तो जपानच्या पुढे गेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, 2026 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 4.51 ट्रिलियनवर डॉलर्सवर पोहोचेल, तर जपान 4.46 ट्रिलियन डॉलर्सवर असेल. 2030 पर्यंत भारताचा जीडीपी 7.3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य असून त्या काळात भारत जर्मनीलाही मागे टाकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
आव्हाने आणि वास्तव
एकीकडे अर्थव्यवस्था विस्तारत असली तरी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारत अजूनही बराच मागे आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, भारताचे दरडोई उत्पन्न 2,694 डॉलर्स आहे, तर जपानचे दरडोई उत्पन्न 32 हजार 487 डॉलर्स आणि जर्मनीचे 56,103 डॉलर्स आहे. याशिवाय अमेरिकेने रशियन तेलाच्या खरेदीवरून भारतावर लादलेले निर्बंध आणि रुपयाची घसरण ही मोठी आव्हाने सध्या देशासमोर आहेत.
रोजगार निर्मितीचे आव्हान
भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त झाली असून, देशातील 25 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 10 ते 26 वयोगटातील आहे. या तरुण पिढीसाठी दर्जेदार रोजगार निर्माण करणे हे सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी तरुण कार्यशक्तीला उत्पादक कामात सामावून घेणे आवश्यक आहे, असे सरकारी टिप्पणीत नमूद केले आहे.