Qualcomm's 2 NM Chip | सेमीकंडक्टर डिझाईन क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप

क्वालकॉमच्या 2 एनएम चिपचे डिझाईन पूर्ण
Qualcomm's 2 NM Chip |
Qualcomm's 2 NM Chip | सेमीकंडक्टर डिझाईन क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप
Published on
Updated on

बंगळूर; वृत्तसंस्था : भारताने जागतिक सेमीकंडक्टर डिझाईन क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्वालकॉमच्या अत्याधुनिक 2 नॅनोमीटर (एनएम) चिपच्या डिझाईनचे केंद्रीय रेल्वे, माहिती प्रसारण आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे या वर्षाच्या अखेरीस फ्लॅगशिप अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये भारतात तयार केलेली अत्याधुनिक चिप वापरली जाणार आहे.

2 नॅनोमीटर हे सध्या जगातील सर्वात प्रगत सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आहे. आजवर अ‍ॅपल किंवा एनव्हिडियासारख्या मोजक्याच कंपन्या या स्तरावर काम करत होत्या. हे तंत्रज्ञान भारतात डिझाईन होणे म्हणजे भारत आता तंत्रज्ञानाच्या शर्यतीतही बाजी मारणारा देश बनला आहे. ही चिप डिझाईन करण्याची प्रक्रिया (टेप आऊट) बंगळूर, चेन्नई आणि हैदराबाद येथील इंजिनिअरिंग सेंटर्समध्ये पूर्ण झाली. ही सेंटर्स केवळ बॅक एंड कामापुरती मर्यादित न राहता चिपची मूळ डिझाईन आणि एआय ऑप्टिमायझेशनमध्ये प्रमुख्य भूमिका बजावत आहेत. ही चिप भविष्यात स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 आणि स्नॅपड्रॅगन एक्स एलिट 3 असू शकते.

सर्वांत प्रगत आणि सूक्ष्म

क्वालकॉमची 2 नॅनोमीटर चिप ही सेमीकंडक्टर तंत्रज्ञानातील सध्याची सर्वात प्रगत आणि सूक्ष्म श्रेणीतील चिप आहे. तांत्रिक भाषेत नॅनोमीटरचा आकडा जितका कमी असतो, तितकी त्या चिपची कार्यक्षमता जास्त आणि वीज वापर कमी असतो. ही चिप प्रामुख्याने 2026 च्या अखेरीस येणार्‍या प्रीमियम स्मार्टफोन्स आणि हाय एंड लॅपटॉप्समध्ये (उदा. स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6) वापरली जाईल. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्रोसेसिंगचा वेग प्रचंड वाढणार आहे. विशेष म्हणजे, या जागतिक दर्जाच्या चिपचे संपूर्ण डिझाइन कार्य आणि टेपआऊट (निर्मितीपूर्वीचा अंतिम टप्पा) क्वालकॉमच्या भारतातील बंगळूर, चेन्नई आणि हैदराबाद येथील केंद्रांमध्ये पूर्ण झाले आहे. भारताच्या डिझाइन क्षमतेचे ते यश मानले जाते.

काय आहे टेप आऊट व नवीन चिप?

टेप आऊट हा चिप डिझाईन प्रक्रियेतील अंतिम टप्पा असतो. भारतात डिझाईन झालेली ही 2 एनएम चिप अत्यंत प्रगत असून ती प्रामुख्याने स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 मोबाईल प्लॅटफॉर्म आणि स्नॅपड्रॅगन एक्स एलिट 3 पीसी प्लॅटफॉर्मसाठी वापरली जाण्याची शक्यता आहे. हे डिझाईन पूर्ण होणे म्हणजे भारतीय इंजिनिअर्सच्या जागतिक दर्जाच्या कौशल्याची पावती आहे.

आयएसएम 2.0 ची त्रिसूत्री

केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी जाहीर केलेल्या इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 मध्ये तीन प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल.

1) डिझाईन आणि स्टार्टअप्स केवळ फॅक्टरी नाही, तर स्वतःचे प्रॉडक्ट बनवणार्‍या भारतीय कंपन्यांना प्राधान्य दिले जाईल.

2) चिप निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री, रसायने आणि गॅस भारतातच तयार करण्यावर भर दिला जाईल.

3) विद्यापीठांशी भागीदारी करून विशिष्ट क्षेत्रांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news