

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय राजकीय दौर्यादरम्यान भारत आणि इस्रायल यांच्यातील सामरिक, तंत्रज्ञान आणि आर्थिक भागीदारीला नवे पंख मिळाले आहेत. जेरुसलेममध्ये पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या उपस्थितीत गुरुवारी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा, कृषी, शिक्षण, व्यापार आदी क्षेत्रांत अनेक करार आणि सामंजस्य करार (एमआयू) करण्यात आले. हे करार दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत आणि बहुआयामी बनवणारे ठरतील.
या करारांमुळे संशोधन, व्यापार आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढेल. विशेषतः एआय, सायबर सुरक्षा आणि डिजिटल पेमेंटस्मध्ये नवीन संधी निर्माण होतील. मोदी आणि नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत हे करार महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा इस्रायलच्या मासाव प्रणालीशी जोडणी होण्याचा करार झाला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये डिजिटल व्यवहार सोपे होतील.
कृषी, नवोन्मेष क्षेत्रात विशेष भर
कृषी क्षेत्रात भारत-इस्रायल इनोव्हेशन सेंटरची स्थापना आणि सांस्कृतिक आदान-प्रदान करारावर स्वाक्षर्या झाल्या. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदेओन सआर आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हे करार केले. याशिवाय मासेमारी आणि मत्स्यव्यवसाय, भूभौतिकीय संशोधन, राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (लोथल) च्या विकासासाठी करार झाले. हे करार भारतीय शेतकर्यांना इस्रायली तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यास मदत करतील, जसे की ड्रिप इरिगेशन, कीड नियंत्रण आणि हरितगृह शेती.
शिक्षणातही सहकार्य वाढ
शिक्षण क्षेत्रात एआयच्या माध्यमातून सहकार्य वाढवण्याचा करार झाला, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी क्षितिज स्कॅनिंगवर घोषणापत्र स्वाक्षरी केले. सायबर उत्कृष्टता केंद्राची स्थापना आणि व्यावसायिक मध्यस्थता करार देखील महत्त्वाचे आहेत.
व्यापार, आर्थिक सहकार्य वाढणार
व्यापार, सेवा, उत्पादन आणि रेस्टॉरंट क्षेत्रातील अंमलबजावणी प्रोटोकॉल पूर्ण झाले. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण आणि इस्रायल सिक्युरिटीज अॅथॉरिटी यांच्यातील वित्तीय क्षेत्रातील सहकार्य मजबूत होईल. चौथ्या भारत-इस्रायल सीईओ फोरमचा अहवाल सादर करण्यात आला. हे करार दोन्ही देशांच्या संबंधांना विशेष सामरिक भागीदारीच्या स्तरावर नेऊन जातील.