

उडपी; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विकसित भारतासाठी नऊ संकल्पांचा एक आराखडा सादर करून 2047 पर्यंत हा मूलमंत्र स्वीकारण्याचे आवाहन केले.
कर्नाटकातील उडुपी येथील पवित्र श्रीकृष्ण मठात आयोजित भव्य लक्ष कंठ गीता पारायण कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी भगवद्गीतेतील कर्तव्याच्या सिद्धांतांमधून प्रेरणा घेत ही आवाहने आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी मोदी म्हणाले की, भगवान श्रीकृष्णांचे संपूर्ण जीवन आणि गीतेचा प्रत्येक अध्याय कृती, कर्तव्य आणि कल्याणाचा संदेश देतो. भारताच्या हजारो वर्षांच्या जुन्या आध्यात्मिक वारशाची जिवंत दिव्यता अनुभवण्याचा क्षण असे वर्णन केले. जेव्हा इतके लोक गीतेसारख्या पवित्र ग्रंथाचे पठण करतात. तेव्हा एक विशेष ऊर्जा निर्माण होते, जी मन आणि बुद्धीला एक नवीन स्पंदन आणि एक नवीन शक्ती देते. ही ऊर्जा अध्यात्माची शक्ती आहे आणि सामाजिक एकात्मतेची शक्तीदेखील आहे, असे ते म्हणाले.
9 संकल्प
जलसंवर्धन : पाणी वाचवणे आणि नद्यांचे संरक्षण करणे.
वृक्षारोपण : ‘एक पेड माँ के नाम’सारख्या वृक्षारोपण मोहिमांमध्ये सहभागी होणे.
गरिबांचे उत्थान : किमान एका गरीब व्यक्तीचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
स्वदेशीचा स्वीकार : स्वदेशीची कल्पना स्वीकारणे, व्होकल फॉर लोकल
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे.
निरोगी जीवनशैली : आहारात भरडधान्यांचा समावेश करणे, तेलाचा वापर कमी.
योगाभ्यास करणे आणि त्याला जीवनाचा भाग बनवणे.
हस्तलिखितांचे जतन : हस्तलिखितांमध्ये दडलेल्या भारताच्या प्राचीन ज्ञानाच्या संवर्धनासाठी सहकार्य करणे.
वारसास्थळांना भेट : वारशाशी संबंधित देशातील किमान 25 ठिकाणांना भेट देणे.