

नवी दिल्ली : कृषी आणि बांधकाम क्षेत्राच्या- कामगिरीमुळे एप्रिल ते जून 2025 या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 7.8 टक्क्यांवर गेले. गेल्या पाच तिमाहीतील ही सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा 1.3 टक्क्याने जीडीपी वधारला.
आरबीआयसह विविध अर्थतज्ज्ञांनी एप्रिल ते जूनमधील जीडीपी 6.3 ते 7 टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला होता. एनएसओच्या माहितीनुसार स्थिर किमतीवर आधारित वास्तविक जीडीपी एप्रिल ते जून 2025 या कालावधीत 47.89 लाख कोटी रुपयांवर राहिला. यंदा जीडीपीत 7.8 टक्के वाढ झाली. चालू किमतीवर आधारित तिमाही जीडीपी 86.05 लाख कोटी रुपये असून गतवर्षी याच कालावधीत 79.08 लाख कोटी रुपये होता. चालू दरानुसार जीडीपी 8.8 टक्के होतो.
या तिमाहीत कृषी क्षेत्राने 3.7 टक्क्यांनी प्रगती केली. गतवर्षी या वाढीचा दर अवघा दीड टक्के होता. खाण क्षेत्राची कामगिरी 3.1 टक्क्यांनी घटली आहे. उत्पादन उद्योगाने गतवर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 7.7 टक्क्यांनी वाढ नोंदवली.
गतवर्षाच्या तिमाहीपेक्षा केंद्र सरकारने भांडवली खर्चात 52 टक्के वाढ केली. बांधकाम, कृषी क्षेत्राने चांगली वाढ नोंदवली. विमान माल वाहतूक, वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) वाढलेले उत्पन्न, स्टीलच्या उत्पन्नात झालेली वाढ यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळाले.