

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने सोमवारी भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 6.5 टक्के आणि पुढील आर्थिक वर्षात 6.7 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. कर कपात आणि पतधोरणातील सवलतींमुळे उपभोगावर आधारित वाढीला चालना मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.8 टक्के राहिला असून, हा गेल्या पाच तिमाहींमधील सर्वाधिक वेग आहे. दुसर्या तिमाहीची (जुलै-सप्टेंबर) अधिकृत आकडेवारी 28 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, जो मागील आर्थिक वर्षातील 6.5 टक्क्यांच्या वाढीपेक्षा अधिक आहे. एस अँड पी ने पुढे म्हटले आहे की, जर भारताने अमेरिकेसोबत व्यापार करार यशस्वी केला, तर त्यामुळे अनिश्चितता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे श्रम-केंद्रित क्षेत्रांना चालना मिळेल. “वस्तू आणि सेवा कराचे कमी केलेले दर मध्यमवर्गीय उपभोगाला आधार देतील आणि यावर्षी जाहीर झालेल्या आयकर कपात आणि व्याजदर कपातीला पूरक ठरतील. या बदलांमुळे चालू आणि पुढील आर्थिक वर्षात गुंतवणुकीच्या तुलनेत उपभोग हा वाढीचा एक मोठा चालक बनण्याची शक्यता आहे,” असे या संस्थेने म्हटले आहे.
‘एस अँड पी’ने आपल्या इकॉनॉमिक आऊटलुक एशिया-पॅसिफिक अहवालात म्हटले आहे की, “आम्हाला अपेक्षा आहे की, भारताचा जीडीपी आर्थिक वर्ष 2026 मध्ये 6.5 टक्के आणि आर्थिक वर्ष 2027 मध्ये 6.7 टक्क्यांनी वाढेल, ज्यात धोके समान प्रमाणात संतुलित आहेत. अमेरिकेच्या शुल्काचा परिणाम असूनही, मजबूत उपभोगामुळे देशांतर्गत वाढ भक्कम राहिली आहे.”