

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 6.4 टक्क्यांनी वाढेल. अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीसह विविध देशांचा समावेश असलेल्या जी-20 समूहात भारताचा वाढीचा वेग सर्वाधिक असेल, असा अंदाज मूडीज् रेटिंग एजन्सीने वर्तविला आहे.
बँकिंग प्रणाली पाहणी अहवालानुसार, बँकांच्या मालमत्तेची गुणवता चांगली राहील. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर मूडीज्ने आपल्या बँकिंग प्रणालीवरील अहवालात म्हटले आहे की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये (एमएसएमई) काही प्रमाणात तणाव असला, तरी बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता लवचिक राहील. असे असले, तरी कर्जाचे नुकसान सहन करण्यासाठी बँकांकडे पुरेसा राखीव निधी असल्याचे अहवालात म्हटले आहे. देशांतर्गत मागणी चांगली असल्याने भारताचा जीडीपी चांगल्या दराने वाढेल. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात पुढील आर्थिक वर्षात 6.8 ते 7.2 टक्के जीडीपी राहील, असे म्हटले आहे. त्याहून कमी अर्थगती मूडीज् रेटिंगच्या अहवालात दाखविण्यात आली आहे.
एकूण आर्थिक स्थिती स्थिर राहणार
‘मूडीज्’च्या अंदाजानुसार, पुढील 12 ते 18 महिन्यांत आर्थिक परिस्थिती एकूणच स्थिर राहील. कंपन्यांची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि बँकांमधील कर्जबुडीतपणाचे प्रमाण नियंत्रणात राहील. वाढत्या कर्जपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवरही बँका आपले भांडवली साठे मजबूत ठेवू शकतील.
अहवाल सांगतो
* सातत्याने होणारी आर्थिक वाढ देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत आधार देणार
* बँकिंग व्यवस्था स्थिर राहून विविध क्षेत्रांमध्ये कर्जाची मागणी वाढत राहणार
* जीएसटीमधील सुधारणा आणि उत्पन्न करात दिलेल्या सवलतीमुळे लोकांचा खर्च वाढेल
* स्थिर चलनविषयक धोरणामुळे आर्थिक वातावरण अनुकूल राहणार