

नवी दिल्ली : दोन वर्षात जीडीपी घसरून ५.४ टक्क्यांवर आला. मागील दोन वर्षातली ही सगळ्यात मोठी घसरण आहे म्हणत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. चारचाकी गाड्या, घर घेण्याचा घटलेला दर, दैनंदिन वस्तूंच्या किमती यावरूनही राहुल गांधींनी आकडेवारीसह सरकारवर टीका केली.
राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. राहुल गांधी म्हणाले की, देशातील शेतकरी, मजूर, मध्यमवर्ग आणि गरीब विविध आर्थिक समस्यांशी झुंजत आहेत. किरकोळ महागाई दराने १४ महिन्यात सर्वाधिक ६.२१ टक्क्यांचा उच्चांक गाठला आहे. तसेच भारताचा जीडीपी दर दोन वर्षांतील सर्वात कमी ५.४ क्क्यांवर आला आहे. केवळ काही मोजक्या लोकांनाच फायदा होत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था प्रगती करू शकत नाही हे स्पष्ट आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा बटाटे आणि कांद्याच्या दरात सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय रुपयाने ८४.५० ही नीचांकी पातळी गाठली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, देशातील बेरोजगारीने ४५ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. गेल्या ५ वर्षात कामगार, कर्मचारी आणि छोटे व्यापारी यांचे उत्पन्न थांबले आहे किंवा लक्षणीय घटले आहे. १० लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या गाड्यांची विक्री २०१८-१९ च्या तुलनेत ८० टक्क्यांहून ५० टक्के एवढी कमी झाली आहे. घरांची विक्री ३८ टक्क्यावरून २२ टक्क्यांवर आली आहे. याशिवाय, दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या उत्पादनांची मागणी आधीच कमी होत आहे. कॉर्पोरेट कराचा वाटा गेल्या १० वर्षांत ७ टक्क्यांनी घटला आहे, तर आयकराचा वाटा ११ टक्क्यांनी वाढला आहे. म्हणूनच भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी नवीन विचारांची गरज आहे आणि व्यवसायांसाठी नवीन करार हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. तेव्हाच सर्वांना पुढे जाण्याची समान संधी मिळेल आणि आपल्या अर्थव्यवस्थेचे चाक पुढे सरकेल, असेही राहुल गांधी म्हणाले.