

नवी दिल्ली : युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्ष त्वरित संपुष्टात यावा, यासाठी केल्या जाणार्या प्रत्येक प्रयत्नाला भारताचा पाठिंबा असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिली. फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी द्विपक्षीय चर्चेनंतर ते बोलत होते. उभय देशांत व्यापक स्वरूपात विविध करार झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लष्करी बळाद्वारे कोणताही प्रश्न सुटू शकत नाही, असेही ठामपणे सांगितले.
भारत आणि फिनलंड हे दोन्ही देश कायद्याचे राज्य, संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवतात. वाढत्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यावर भारत आणि फिनलंड यांच्यात सहमती झाली आहे. जगातून सर्व प्रकारच्या दहशतवादाचे उच्चाटन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे मोदी यांनी नमूद केले. फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष स्टब चार दिवसांच्या भारत दौर्यावर आहेत. गुरुवारी ‘हैदराबाद हाऊस’ येथे पंतप्रधान मोदी आणि फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष स्टब यांच्यात व्यापक चर्चा झाली. त्यानंतर अनेक प्रमुख करार आणि सहकार्य कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली.
उदयोन्मुख तंत्रज्ञानातील सहकार्य
पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही देशांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, 6-जी टेलिकॉम, ऊर्जा यासारख्या क्षेत्रांसह उदयोन्मुख तंत्रज्ञानात सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शविली आहे. ही भागीदारी संरक्षण, अवकाश, अर्धवाहक आणि दुर्मीळ खनिजे यासारख्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करेल.
भारत प्रभावशाली देश : स्टब
फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष स्टब यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणि आर्थिक प्रगतीची प्रशंसा केली. ते म्हणाले, भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात प्रभावशाली देशांपैकी एक आहे. युरोपसाठी भारत एक महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार बनला आहे. भारत म्हणजे जगातील सर्वात वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि गेल्या दशकात येथे मोठा बदल दिसून आला आहे.
व्यापार दुप्पट करण्याचे ध्येय
दोन्ही देशांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले आहे. डिजिटल सहकार्यासाठी एक संयुक्त कार्यगट आणि 6-जी तंत्रज्ञानावर संयुक्त कार्यदल स्थापन करण्यात आले आहेत. स्टार्टअप सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी इंडो-फिनलंड स्टार्टअप कॉरिडोरची स्थापनाही जाहीर करण्यात आली. या उपक्रमांतर्गत, भारतीय स्टार्टअप हेलसिंकी येथे होणार्या स्लश कार्यक्रमात आणि नवी दिल्ली येथे होणार्या फिनिश स्टार्टअपच्या स्टार्टअप महाकुंभात सहभागी होतील.
स्नेहभोजनाला डॉ. योगेश जाधव यांची खास उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ एका खास भोजनाचे आयोजन केले होते. या स्नेहभोजनास आमंत्रित एकूण 36 पाहुण्यांमध्ये फिनलंडच्या शिष्टमंडळातील सदस्य आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता. या स्नेहभोजनास ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जाधव कुटुंबातील सौहार्द यावेळी पाहुण्यांना दिसून आले. पंतप्रधान मोदींनी डॉ. योगेश जाधव यांची फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर पंतप्रधानांनी डॉ. योगेश जाधव यांच्याशी मराठीत संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी डॉ. जाधव यांचे वडील डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.