

भोपाळ ः वृत्तसंस्था
भारतीय अर्थव्यवस्था दोन वर्षांत जगातील वेगवान अर्थव्यवस्था होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक बँकेच्या अहवालाचा हवाला देत दिली.
ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दरम्यान, अदानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी मध्य प्रदेशमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही यावेळी केली.
परिषदेस संबोधित करताना मोदी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग वाढत आहे. जगातील सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारत घोडदौड करीत आहे. जागतिक बँकेनेही भारतीय अर्थव्यवस्था दोन वर्षांत जगातील वेगवान अर्थव्यवस्था असणार असल्याचे नमूद केले आहे. एअरोस्पेसह अन्य क्षेत्रामध्ये भारत जगातील पुरवठा करण्यास मदत करीत असल्याने भारतामध्येही गुंतवणूक वाढत असल्याचे मोदी यांनी सांगितले. मध्य प्रदेश सरकारने देशात इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पात आघाडी घेतल्याचेही मोदी यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, अदानी समूहासह रिलायन्स समूहही मध्य प्रदेशात 60 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.
मध्य प्रदेशात ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी, हवाईअड्डा परियोजना, कोळसा, गॅस, पंप स्टोअरेज, सिमेंट, स्मार्ट मीटर, थर्मल ऊर्जा आदी विविक्ष क्षेत्रांमध्ये अदानी समूहातर्फे 2.1 लाख कोटींवर गुंतवणूक करण्यात येणार आहे. मध्य प्रदेश सरकारसोबत त्यांची यासंदर्भात चर्चा झाली आहे. यामुळे मध्य प्रदेशात 2030 पर्यंत 1 लाख 20 हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती अदानी समूहाच्या वतीने देण्यात आली.