PM Modi Parmelin meeting | भारतात १५ वर्षांत येणार १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक

स्वित्झर्लंड व्यापार ते एआयपर्यंत वाढणार सहकार्य; पंतप्रधान मोदी यांची स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष पारमेलिन यांच्याशी चर्चा
PM Modi Parmelin meeting |
PM Modi Parmelin meeting | भारतात १५ वर्षांत येणार १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : भारत आणि स्वित्झर्लंड यांनी आपल्या संबंधांची व्याप्ती आर्थिक भागीदारीच्या पुढे नेत गुंतवणूक, रोजगार, संरक्षण उत्पादन, अणुऊर्जा, पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), विज्ञान-तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत- युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (ईएफटीए) व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या माध्यमातून पुढील १५ वर्षांत भारतात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि १० लाख थेट रोजगारांचे उद्दिष्ट गाठले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय परमेलिन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांनी बाजारपेठेत प्रवेश वाढवणे, गुंतवणूक सुलभ करणे आणि वाहतूक व मोबिलिटीपासून संयुक्त संशोधनापर्यंत अनेक क्षेत्रांत सहकार्य मजबूत करण्यास सहमती दर्शवली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन देशांमध्ये ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप करार लागू झाला. युरोपियन आर्थिक समूहासोबतचा भारताचा हा पहिलाच एफटीए आहे. यादरम्यान भारतात १०० अब्ज डॉलर गुंतवणूक आणि १० लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. 'मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप' आणि 'यंग प्रोफेशनल्स' करारामुळे भारतीय विद्यार्थी, संशोधक आणि तरुणांसाठी स्विट्झर्लंडमध्ये नव्या संधी निर्माण होणार आहेत.

भारतीय उत्पादनांचा स्विस बाजारात विस्तार

भारतातून स्वित्झर्लंडला कृषी उत्पादने, फार्मा, टेक्सटाईल आणि अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीसाठी बाजारपेठ विस्तारली जात आहे. दुसरीकडे, बायोटेक, लाइफ सायन्सेस, बँकिंग, विमा आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्रात स्विस गुंतवणूक आकर्षित केली जाईल. दोन्ही देशांनी लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनावर चर्चा केली असून, अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर सहमती दर्शवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news