

नवी दिल्ली : कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांनी सोमवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे भारत-कॅनडा द्विपक्षीय भागीदारीला नवी गती देण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लागेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी यावर्षी जूनमध्ये कॅनडात झालेल्या जी-7 शिखर परिषदेतील आपल्या दौर्याची आठवण करून दिली, ज्यादरम्यान त्यांची पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत अत्यंत फलदायी बैठक झाली होती. यावेळी पंतप्रधानांनी व्यापार, सुरक्षा, ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील संबंधात वाढीव सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री म्हणून आपल्या पहिल्या भारत दौर्यावर रविवारी नवी दिल्लीत दाखल झालेल्या आनंद यांनी वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, कॅनडा आणि भारत कायद्याची अंमलबजावणी आणि सुरक्षा संवाद कायम ठेवत व आपले आर्थिक संबंध विस्तारत द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेत आहेत.
तत्पूर्वी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अनिता आनंद यांची भेट घेतली आणि आपली भागीदारी पुढे नेण्यासाठी आवश्यक यंत्रणा पुनर्संचयित आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी रचनात्मक चर्चा केली. दोन्ही मंत्र्यांनी जागतिक घडामोडी आणि सामायिक आव्हानांवरील प्रतिसादांवरही विचारविनिमय केला.