Dengue Vaccine : भारतात डेंग्यूविरुद्धच्या पहिल्या लसीला मंजुरी! 4 ते 60 वयोगटातील व्यक्तींना घेता येणार डोस

TAK-003 Qdenga : ‘क्युडेन्गा‌’ लसीमुळे डेंग्यूविरुद्ध हत्यार उपलब्ध, वाढत्या रुग्णसंख्येवर येणार नियंत्रण
Dengue Vaccine : भारतात डेंग्यूविरुद्धच्या पहिल्या लसीला मंजुरी! 4 ते 60 वयोगटातील व्यक्तींना घेता येणार डोस
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतात दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचे संकट अक्राळविक्राळ रूप धारण करते. डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताने डेंग्यूवरील पहिल्या लसीला म्हणजेच TAK-003 अर्थात Qdenga (क्युडेन्गा) ला अधिकृत मंजुरी दिली आहे. औषध महानियंत्रकांच्या (DCGI) तज्ज्ञ समितीने 4 ते 60 वयोगटातील लोकांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे मानले आहे.

लसीची कार्यपद्धती आणि विशेष वैशिष्ट्ये

जपानच्या टाकेडा फार्मास्युटिकल्स कंपनीने विकसित केलेली ही लस अत्यंत प्रभावी मानली जात आहे. या लसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या व्यक्तीला पूर्वी डेंग्यू होऊन गेला आहे किंवा नाही, याची कोणतीही तपासणी न करता ही लस देता येते. डेंग्यूच्या चारही प्रकारच्या (Serotypes) विषाणूंपासून संरक्षण देण्याची क्षमता क्युडेन्गा लसीमध्ये आहे. क्लिनिकल ट्रायल्समध्ये असे दिसून आले आहे की, ही लस चार वर्षांहून अधिक काळ संरक्षण देऊ शकते.

दोन डोसमध्ये मिळणार सुरक्षा

ही लस दोन डोसमध्ये दिली जाणार असून, त्यामध्ये तीन महिन्यांचे अंतर असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) ज्या भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त आहे, तिथे या लसीचा वापर उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या लसीचे उत्पादन हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेडच्या माध्यमातून भारतातच केले जाणार आहे. यामुळे भविष्यात ही लस माफक दरात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

केवळ लस नव्हे, तर खबरदारीही महत्त्वाची

सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये 44 हजार असलेले डेंग्यूचे रुग्ण 2023 व 2024 या दोन वर्षात 2.3 लाखांच्या पार गेले आहेत; तर गेल्या वर्षी सव्वा लाख रुग्ण सापडले होते. तथापि, तज्ज्ञ असेही मानतात की, ही लस म्हणजे जादुई समाधान नाही. लस डेंग्यूचा धोका नक्कीच कमी करेल. परंतु तो पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. डेंग्यूची तीव्रता अनेकदा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लस उपलब्ध झाली असली तरी डासांपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे तितकेच आवश्यक आहे. लसीमुळे डेंग्यूची तीव्रता आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल, मात्र डासांची उत्पत्ती रोखणे आणि वेळेवर उपचार घेणे हाच डेंग्यूमुक्तीचा खरा मंत्र ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news