First Dengue Prevention Vaccine | भारतात पहिल्यांदाच डेंग्यू प्रतिबंधक लसीला मंजुरी

‘क्यूडेंगा’ लस बाजारात येणार; ४ ते ६० वर्षांपर्यंतच्या लोकांना पूर्वतपासणीशिवाय देण्‍यात येणार
First Dengue Prevention Vaccine |
First Dengue Prevention Vaccine | भारतात पहिल्यांदाच डेंग्यू प्रतिबंधक लसीला मंजुरी
Published on
Updated on

नवी दिल्‍ली; वृत्तसंस्‍था : भारतात पहिल्यांदाच डेंग्यू प्रतिबंधक लसीला मंजुरी मिळाली आहे. ड्रग्‍ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या ‘क्यूडेंगा’ लसीला बाजारात वापरण्याची परवानगी दिली आहे. कंपनीच्‍या म्‍हणण्‍यानुसार, ही लस ४ ते ६० वर्षांपर्यंतच्या लोकांना दिली जाऊ शकते. ही लस घेण्यापूर्वी, व्यक्तीला यापूर्वी कधी डेंग्यूची लागण झाली होती की नाही, याची तपासणी करण्याची गरज भासणार नाही.

भारतात मिळालेली मंजुरी ‘ताकेडा’च्या जागतिक क्लिनिकल डेव्हलपमेंट प्रोग्रामवर आधारित आहे. याअंतर्गत फेज-I, फेज-II आणि फेज-III चे एकूण १९ क्लिनिकल ट्रायल्स करण्यात आले, ज्यात २८ हजारांहून अधिक लोकांनी भाग घेतला. ‘क्यूडेंगा’चे दोन डोस दिले जातात. प्रत्येक डोस ०.५ मिलिलिटरचा असतो आणि त्वचेखाली इंजेक्शनद्वारे दिला जातो. दोन्ही डोसमध्‍ये तीन महिन्यांचे अंतर ठेवले जाते.

देशातच होईल लसीचे उत्पादन

‘क्यूडेंगा’ (TAK-003) ही खरे तर जपानी कंपनी ‘ताकेडा’ने शोधलेली लस आहे; पण आपल्यासाठी सर्वात मोठी दिलासादायक बाब म्हणजे, ‘मेक इन इंडिया’अंतर्गत या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन देशातच होईल. यासाठी ‘ताकेडा’ने हैदराबादमधील प्रसिद्ध फार्मा कंपनी ‘बायोलॉजिकल ई’सोबत करार केला आहे. भारतातच उत्पादन होत असल्यामुळे याचा पुरवठा जलद आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय होईल. याची निश्चित किंमत अद्याप जाहीर व्हायची आहे; पण ही आपल्याच देशात तयार होईल, त्यामुळे सामान्य लोकांच्या खिशावर जास्त भार पडणार नाही, अशी अपेक्षा आहे. बाजारात लाँच झाल्यानंतर, खबरदारी म्हणून सुरुवातीच्या ६ महिन्यांपर्यंत लोकांवर होणाऱ्या तिच्या परिणामावर पूर्णपणे लक्ष ठेवले जाईल.

भारत जगातील डेंग्यूने सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक

‘ताकेडा’च्या मते, भारत जगातील डेंग्यूने सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये डेंग्यू विषाणूचे चारही सेरोटाईप एकाचवेळी पसरत आहेत. कंपनीचे वैद्यकीय व्यवहारप्रमुख गोह चू बेंग यांनी सांगितले की, ‘क्यूडेंगा’ला चारही सेरोटाईपपासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. ही मंजुरी भारतात डेंग्यू प्रतिबंधाच्या रणनीतीला बळकटी देईल. यासोबतच मच्छर नियंत्रण, पाळत ठेवणे, जनजागृती आणि इतर सार्वजनिक आरोग्य उपाययोजनादेखील आवश्यक राहतील.

कंपनीने असेही म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटना (डब्‍ल्‍यूएचओ) डेंग्यू प्रभावित क्षेत्रांमध्ये ‘क्यूडेंगा’च्या वापराची शिफारस करते. ‘डब्‍ल्‍यूएचओ’चे समर्थन आहे की, जास्त संसर्ग असलेल्या भागांमध्ये याला सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमात प्री-व्हॅक्सिनेशन स्क्रीनिंगशिवाय समाविष्ट केले जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news