

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने संरक्षणसज्जतेवर आणखी भर देण्याचे ठरवले आहे. यास्तव केंद्र सरकारने नौदल आणि हवाई दलाची प्रहारक्षमता वाढवण्यासाठी 70 हजार कोटी रुपये मोजून जर्मनीकडून सहा अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, सोबतच हवाई दलासाठी इस्रायलकडून रँपेज क्षेपणास्त्रे खरेदी करण्यालाही मान्यता देण्यात आली आहे.
भारतात बांधल्या जाणार्या या पाणबुड्यांच्या खरेदीसाठी वाटाघाटी सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हा करार 70 हजार कोटी रुपयांचा आहे. संरक्षण मंत्रालयाने जर्मन कंपनी थायसेनक्रूप मरीन सिस्टीम्ससोबत सहा पाणबुड्या बांधण्यासाठी माझगाव डॉकयार्डची भागीदार म्हणून निवड केली आहे.
दुसरा करार म्हणजे इस्रायली रॅम्पेज हवेतून जमिनीवर मारा करणार्या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा खरेदी करणे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानमधील मुरिदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी मुख्यालयांवर अचूक हल्ल्यांमध्ये या सुपरनॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आणि तो अत्यंत यशस्वी ठरला होता.
या पाणबुड्या तीन आठवडे पाण्याखाली राहू शकतात.
शत्रूच्या रडारला सुगावा लागत नाही.
पाणबुड्या एआय प्रणालीने सज्ज.
त्यासाठी एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन ही सिस्टीम भारताकडून विकसित.
हवेतून जमिनीवर प्रभावी मारा.
लांबी 4.7 मीटर, वजन 570 किलो.
कोणत्याही लढाऊ विमानावर सहज बसविणे शक्य.
पल्ला (रेंज) 150 ते 250 किमी.
शत्रूचे लष्करी तळ, हवाई तळ, दारूगोळा कोठार, रडार केंद्र अचूकपणे नष्ट करू शकण्याची जबरदस्त क्षमता या क्षेपणास्त्रात असून ते एफ-15, एफ-16, एफ-35 आणि भारताच्या सुखोई-30 एमकेआय यांसारख्या लढाऊ विमानांमधून सहज डागता येते.