

नवी दिल्ली : हवामान बदलांमुळे प्रभावित होणाऱ्या पहिल्या १० देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. हवामान जोखीम निर्देशांक (सीआरआय) क्रमवारीनुसार (१९९३-२०२२) भारत सहाव्या क्रमांकावर आहे. या काळात भारताला ४०० हून अधिक हवामान बदलांमुळे घडलेल्या घटनांचा सामना करावा लागला. यामध्ये जवळपास ८०,००० लोकांचा मृत्यू झाला आणि १८० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. बॉन आणि बर्लिन येथील स्वतंत्र विकास, पर्यावरण आणि मानवाधिकार संघटना जर्मनवॉचने २०२५ चा हवामान जोखीम निर्देशांक जाहीर केला आहे.
जर्मनवॉचच्या माहितीनुसार डोमिनिका, चीन आणि होंडुरास हे हवामान घटनांच्या परिणामांमुळे सर्वाधिक प्रभावित झालेले देश आहेत. यात समाविष्ट केलेल्या यादीवरून असे दिसून येते की २०२२ मध्ये पाकिस्तान हा हवामान घटनांमुळे सर्वाधिक प्रभावित देश आहे. याच वर्षात हवामान बदलातील घटनांमुळे प्रभावित झालेल्या पहिल्या दहा देशांमध्ये मात्र भारताचे नाव नाही. तर १९९३-२०२२ च्या आकडेवारीत, डोमिनिका, चीन, होंडुरास, म्यानमार आणि इटली हे भारतापेक्षा पुढे आहेत. या ३० वर्षांच्या कालावधीत, हवामान बदलांमुळे जगभरात ७,६५,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४.२ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे थेट नुकसान झाले. या काळात ९,४०० हून अधिक हवामान बदलाच्या घटना घडल्या. या काळात भारताला पूर, उष्णतेच्या लाटा आणि चक्रीवादळांचा फटका बसला. १९९३, १९९८ आणि २०१३ मध्ये त्याला विनाशकारी पुरांचा सामना करावा लागला. तसेच, २००२, २००३ आणि २०१५ मध्ये तीव्र उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला.
पूर, वादळ, उष्णता आणि दुष्काळ यासारख्या हवामानविषयक घटनांचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन मोठे परिणाम झाले. १९९३ ते २०२२ पर्यंतच्या हवामान बदलांच्या घटनांमध्ये चक्रीवादळांमुळे (३५%) सर्वाधिक मृत्यू झाले. उष्णतेमुळे (३०%) आणि पुरामुळे (२७%) मृत्यूंची संख्याही होती. आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की वादळांमुळे सर्वात जास्त (५६%) आणि त्यानंतर पुरामुळे (३२%) आर्थिक नुकसान झाले. या अहवालात असेही म्हटले आहे की मानव-प्रेरित हवामान बदल हवामान बदलाचा घटनांच्या वारंवारतेवर आणि तीव्रतेवर परिणाम करतात आणि त्यामुळे व्यापक प्रतिकूल परिणाम होतात.