INDIA Alliance Protest : ‘इंडिया’ आघाडीच्या आंदोलनाला ब्रेक, सत्याचा विजय होईपर्यंत प्रदीर्घ लढ्याचा राहुल गांधींचा इशारा

INDIA Alliance Protest : ‘इंडिया’ आघाडीच्या आंदोलनाला ब्रेक, सत्याचा विजय होईपर्यंत प्रदीर्घ लढ्याचा राहुल गांधींचा इशारा
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : ‘काहीही झाले तरी आमचा राजकीय लढा थांबणार नाही आणि अखेर सत्याचाच विजय होईल,’ असा विश्वास राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी (दि. १३) ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख नेते, विरोधी पक्षांचे खासदार, विद्यार्थी संघटना आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात सणासुदीला जनतेला त्रास होऊ नये म्हणून आंदोलन नवरात्र संपेपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय झाल्याचे बैठकीतील उपस्थित सूत्रांनी सांगितले.

सध्या देशात नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला काहीशी उसंत देण्याचा निर्णय ‘इंडिया’ आघाडीने घेतल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. विविध नेत्यांना लोकांशी जनसंपर्क ठेवण्यासाठी सण-उत्सव हे चांगले माध्यम असते. त्यामुळे सर्व खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मतदारसंघात, जिल्ह्यात काही काळ थांबू द्यावे, असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर काही महत्त्‍वपूर्ण निर्णय होतो का, हे बघून पुढील आठवड्यात किंवा नवरात्रौत्सवानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा लढा संयमाने आणि सातत्याने सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची, विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची आणि विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल, राजदचे तेजस्वी यादव, ‘एआयएसए’च्‍या अध्‍यक्षा नेहा बोरा, माकपचे एम. ए. बेबी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय राऊत, तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष यांच्यासह विविध पक्षांचे नेते, खासदार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीनंतर नेत्यांनी संयुक्तपणे माध्यमांशी संवाद साधला.

‘लोकशाहीच्या लढ्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा’

राहुल गांधी म्हणाले की, देशातील लोकशाही व्यवस्था, संविधान आणि निवडणूक प्रक्रियेच्या संरक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष एकाच लढ्याचे वेगवेगळे भाग आहेत. हा लढा काही दिवस किंवा काही महिन्यांत संपेलच, असे नाही. लोकशाही वाचवण्यासाठी वर्ष-दोन वर्षेही संघर्ष करावा लागू शकतो. मात्र, हा लढा यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, जंतर मंतर हे लोकांच्या भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. तेथे आंदोलन करण्यावर निर्बंध आणण्याच्या निर्णयावरही राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला. लोकशाही मार्गाने आपला आवाज उठविण्याचा नागरिकांचा अधिकार हिरावून घेणे सरकारला सहज शक्य होणार नाही, असे ते म्हणाले.

सोमवारी दिल्लीतील मोर्चाला सामान्य नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल राहुल गांधी यांनी आभार मानले. हा केवळ विरोधी पक्षांचा मोर्चा नव्हता, तर लोकशाहीच्या प्रश्नावर नागरिकांनी व्यक्त केलेला आवाज होता, असे ते म्हणाले. आंदोलनाला काहीशी विश्रांती मिळण्याची शक्यता असली, तरी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा ‘इंडिया’ आघाडी पुढेही लावून धरणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news