

अनेक करदात्यांनी ई-मेलमधील विसंगतींबाबत तक्रारी केल्या होत्या. काही करदात्यांना महत्त्वपूर्ण व्यवहारांशी संबंधित चुकीचे तपशील असलेले ई-मेल प्राप्त झाले आहेत.
Income Tax Alert
नवी दिल्ली: करनिर्धारण वर्ष २०२६-२७ साठी 'ॲडव्हान्स टॅक्स ई-कॅम्पेन' अंतर्गत पाठवण्यात आलेल्या काही ई-मेल्समध्ये 'महत्त्वाच्या व्यवहारांबाबत' चुकीची माहिती असल्याचे समोर आले आहे, अशी सूचना (दि. १४) आयकर विभागाने जारी केली आहे. करदात्यांनी अशा ई-मेल्सकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन विभागाने केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आयकर विभागाने म्हटले आहे की, अनेक करदात्यांनी ई-मेलमधील विसंगतींबाबत तक्रारी केल्या होत्या. काही करदात्यांना महत्त्वपूर्ण व्यवहारांशी संबंधित चुकीचे तपशील असलेले ई-मेल प्राप्त झाले आहेत. तांत्रिक सेवा पुरवठादाराच्या माध्यमातून ही त्रुटी दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. करदात्यांना झालेल्या त्रासाबद्दल विभाग दिलगीर आहे," असे विभागाने म्हटले आहे.
विभागाने स्पष्ट केले की, हे ई-मेल केवळ करदात्यांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यास मदत करण्यासाठी आणि 'ॲडव्हान्स टॅक्स'च्या नियमांचे पालन सुलभ व्हावे या उद्देशाने पाठवण्यात आले होते. हे केवळ एक 'रिमाइंडर' होते, मात्र त्यात चुकीचे तपशील गेल्याने गोंधळ निर्माण झाला.
करदात्यांनी त्यांच्या व्यवहारांची अचूक माहिती मिळवण्यासाठी आयकर ई-फायलिंग वेबसाइटवरील 'कॉम्प्लायन्स पोर्टल' (Compliance Portal) मधील 'ई-कॅम्पेन' (e-Campaign) टॅबचा वापर करावा.
जोपर्यंत ही त्रुटी दूर होत नाही, तोपर्यंत करनिर्धारण वर्ष २०२६-२७ च्या ॲडव्हान्स टॅक्स कॅम्पेन संदर्भातील आधीच्या ई-मेल्सकडे दुर्लक्ष करावे.