

पुढारी ऑनलाईन डेस्क: Dowry Case in Uttar Pradesh | हुंडा घेणे किंवा देणे हा कायद्याने गुन्हा असला तरी, अनेक महिलांचा हुड्यासाठी छळ होत असलेली प्रकरणे समोर येत असतात. अशीच एक क्रूर घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. हुंडा दिला नाही म्हणून, सासरच्या लोकांनी सुनेला एचआयव्ही (HIV) बाधित इंजेक्शन टोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाबाबत सहारनपूरमधील न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना पीडित महिलेच्या सासरच्या लोकांविरोधात फोजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महिलेचे आई-वडील त्यांची हुंड्याची मागणी पूर्ण न करू शकल्याने सासरच्यांनी तिला एचआयव्ही बाधित व्यक्तीला टोचलेल्या सुईने इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे.
सहारनपूरचे पोलिस अधिकारी सागर जैन यांनी सांगितले की, पीडित महिला ही सहरणपूरची रहिवासी आहे. तिचा नवरा (वय-३२), दीर (वय-३८), नणंद (वय-३५) आणि सासू (वय-५६) यांच्याविरोधात आयपीसी कलम ३०७, ४९८ए, ३२३, ३२८, ४०६ आणि हुंड्यासंबंधी इतर कलमांच्या आधारे गंगोह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहोत, असे देखील पोलिसांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार ही घटना महिलेच्या हरिद्वार येथील सासरच्या घरी मे २०२४ मध्ये घडली.