

Mehbooba Mufti daughter Iltija Mufti bite police officer
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीर पोलिसांनी 'पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी'च्या नेत्या इल्तिजा मुफ्ती यांना समन्स बजावले आहे. गेल्या मंगळवारी श्रीनगरमध्ये झालेल्या एका आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा यांनी एका पोलिसावर हल्ला केला, त्यांच्या हाताचा चावा घेतला आणि त्यांना जखमी केले. या घटनेनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला ७ वर्ष पूर्ण झाली. याच्या निषेधार्थ ४ ऑगस्टला संध्याकाळी पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि पक्षाच्या नेत्या इल्तिजा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांचा आरोप आहे की, आंदोलनादरम्यान काही निदर्शकांनी रेसिडेन्सी रोड अडवला, लाल चौकाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. याच वेळी इल्तिजा यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
पोलिसांचा दावा आहे की, त्यानंतर झालेल्या झटापटीत इल्तिजा मुफ्ती यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला आणि त्यांच्या हाताचा चावा घेतला. या अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्त्राव होऊ लागला; त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
या प्रकरणी मेहबूबा आणि त्यांची मुलगी या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे आणि अधिकृत कर्तव्यात अडथळा आणणे या आरोपांखाली कोठीबाग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासाचा भाग म्हणून, इल्तिजा यांना शुक्रवारी कोठीबाग पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पीडीपीने पोलिसांचे आरोप फेटाळून लावले आहेत. पक्षाने एका निवेदनात दावा केला आहे की, कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या कथित हल्ल्यानंतर इल्तिजा मुफ्ती रुग्णालयात उपचार घेत आहेत.