

नवी दिल्ली : भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), दिल्ली हे भारतातील विद्यापीठांमध्ये शाश्वततेसाठी अव्वल स्थानावर असून, जागतिक स्तरावर २५५ स्थानांनी झेप घेत १७१ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. २०२५ च्या 'क्यू एस' जागतिक क्रमवारीनुसार, एकूण ९८ भारतीय विद्यापीठांना शाश्वतता क्रमवारीत स्थान मिळाले आहे. देशातील शीर्ष १० संस्थांपैकी नऊ संस्थांनी यावर्षी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे आणि २१ नवीन संस्थांनी या जागतिक क्रमवारीत आपले स्थान मिळवले आहे.
आयआयटी-दिल्ली आणि आयआयटी-कानपूरला पर्यावरणीय प्रभावासाठी जगातील टॉप १०० मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरूला पर्यावरण शिक्षणासाठी जगातील टॉप ५० मध्ये स्थान देण्यात आले आहे. या क्रमवारीत ७८ भारतीय विद्यापीठांपैकी ३४ शिक्षण संस्थांनी गेल्या वर्षीच्या स्थानामध्ये सुधारणा केली आहे आणि ८ विद्यापीठांनी त्यांचे स्थान कायम ठेवले आहे.
"भारतीय उच्च शिक्षण परिसंस्थेसाठी ही एक उत्कृष्ट उपलब्धी आहे. सदर जागतिक क्रमवारी भारतीय विद्यापीठे त्यांच्या शाश्वत उपक्रमांसह पुढे जात असल्याचे दर्शविते, अशी प्रतिक्रिया लंडन स्थित क्वाक्वेरेली सायमंड्स (क्यू एस) उपाध्यक्ष बेन सॉटर यांनी दिली. सामाजिक प्रभाव श्रेणीमध्ये, कामगिरी सुधारण्यासाठी भारतीय विद्यापीठांना काम करण्याची गरज असल्याची बेन स्वॉटर म्हणाले. आरोग्य आणि कल्याण, शिक्षणाचा प्रभाव आणि समानतेच्या दृष्टीकोनातून देशातील कोणतीही संस्था शीर्ष ३५० मध्ये नाही. भारतातील विद्यापीठांनी नॉलेज एक्सचेंजमध्ये चांगले गुण मिळवले आहेत, असे त्यांनी सांगितले. २०२५ च्या क्रमवारीत १०७ देश आणि प्रदेशांमधील १ हजार ७४० पेक्षा जास्त विद्यापीठांचा समावेश आहे.
यंदाच्या क्रमवारीत जगामध्ये टोरंटो विद्यापीठ हे या वर्षी अव्वल दर्जाचे विद्यापीठ ठरले आहे. ईटीएच झुरिच हे विद्यापीठ दुसऱ्या स्थानावर असून, स्वीडन विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीसाठी तीन मूल्यांकन श्रेणीमध्ये विद्यापीठांची चाचणी केली जाते. त्यामध्ये विद्यापीठाचा पर्यावरणीय प्रभाव, सामाजिक प्रभाव आणि शासन पद्धती पाहिली जाते.